जालना – जालना शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावरील जिल्हा क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहातील विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वसतिगृह व्यवस्थापक प्रमोद खरात यास अटक करण्यात आली आहे.
वसतिगृह व्यवस्थापकाच्या गैरवर्तनाबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी आणि महिला केंद्रप्रमुख यांनी दोन दिवसांपूर्वी वसतिगृहास भेट देऊन माहिती घेतली होती. त्यावेळी अनेक विद्यार्थिनींनी व्यवस्थापकाच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या.
यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जालना शहरात चालविण्यात येत असलेल्या क्रीडा प्रबोधिनीतील व्यवस्थापक प्रमोद खरात याने विद्यार्थिनींच्या सोबत गैरप्रकार केल्याची फिर्याद गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी कदीम जालना पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोक्सो आणि अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवून रविवारी रात्री आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीने एकापेक्षा अधिक मुलींशी गैरवर्तन केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आरती जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.