जालना – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपास्थितीत झालेल्या जालना जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मानपान आणि नाराजीचे प्रदर्शन पहावयास मिळाले.
माजी आमदार सुरेश जेथलिया यांचे भाषण सुरु असताना भाऊसाहेब गोरे आणि त्यांचे समर्थक ‘आम्हाला न्याय द्या” अशा घोषणा देत सभागृहातून व्यासपीठाकडे गेले. जेथलिया यांचा नव्याने पक्ष प्रवेश झाल्याने आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची त्यांची तक्रार होती. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे भाषण सुरु असताना पक्षाचे जालना शहर जिल्हा अध्यक्ष यांनी सभागृहात उभे राहून त्यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर लावला.
यावेळी तटकरे यांनी पक्षाची भूमिका विषद करून लोकसभा अधिवेशनाच्या अगोदर जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्या सोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यापूर्वी पक्ष निरीक्षक पाठवून जालना जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.