जालना – मालवाहू ट्रकने खासगी वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षाला दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार सायंकाळी सहाच्या सुमारास जालना – राजूर रोडवरील राजुर चौफुली परिसरात घडलीय. भरत निवृत्ती खोसे (वय ३३), गणेश तुकाराम बोरसे (वय ३४) आणि सुनीता नारायण वैद्य (वय ३६) अशी तीन मृतांची नावे आहेत. मृत तिघेही ॲपे रिक्षाने जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते.

यादरम्यान राजुर रोडवर सूर्या लाॕन्सजवळ त्यांच्या ॲपे रिक्षाला (क्रमांक एमएच-२१/ २३७२) मालवाहू ट्रकने (क्र. आरजे ०१-जीबी ८४८६) जोराने धडक दिली. या अपघातात ॲपे रिक्षामधील वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मालवाहू ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिन्ही मृतदेह जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवली. तर मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. तसेच या घटनेनंतर फरार झालेल्या ट्रक चालकालाही पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक चंदनझीरा ठाण्यात लावला आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवा येथील अनेक नागरिकांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून मोठा जमाव पोलीस ठाण्यात एकत्र आला होता.