जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड हे कौटुंबिक वादातूनच घडल्याचे उपलब्ध पुराव्यातून उघड होत असल्याचे पोलिसांनी गुरुवारी जाहीर केले. या प्रकरणी मृत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव (वय २९) याला अटक झाली असून पाथर्डीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. न्यायवैद्यक तपासणी अहवालात मिळालेल्या पुराव्यावरून प्रशांतला अटक झाली आहे. विशेष म्हणजे या हत्याकांडाची फिर्याद त्यानेच दिली होती.
हत्येचे नेमके कारण, गुन्हय़ात किती जणांचा समावेश आहे, आरोपीच्या घरातून कोणती शस्त्रे हस्तगत करण्यात आली, गुन्हय़ाचा सूत्रधार प्रशांत हाच आहे का, इतर आरोपी स्थानिक आहेत की बाहेरचे, गुन्हा सुपारी देऊन घडला का, आदी प्रश्नांची उत्तरे १० दिवसांच्या तपासात निष्पन्न होतील, असे विशेष तपास पथकाचे प्रमुख आणि नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी नगर येथे पत्रकारांना सांगितले. उपलब्ध पुरावाही आरोपीला शिक्षा करण्यासाठी पुरेसा असल्याचा दावाही त्यांनी केला.
नातेवाईकच आरोपी झाल्याने ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे कलम वगळणार का, या प्रश्नावरही तपासात निष्पन्न होणारे इतर आरोपी व पुरावे यानुसार निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. तपासातील विलंबाबत ते म्हणाले की, गुन्हा करण्याची पद्धत वेगळी होती, नंतरचे दोनचार दिवस मृतदेहांचे अवयव शोधण्यात गेले, पुरावे गोळा करणे, तक्रारदारच आरोपी निष्पन्न होणे यामुळे अवधी लागू शकतो.
गुन्हय़ाच्या तपासात सध्या ११ पथके आहेत. त्यात सीआयडी, मुंबई, पुणे व नाशिक येथील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ज्या पद्धतीने निर्घृणपणे सोनईत हत्या झाली व मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला, त्यात व जवखेडे हत्याकांडात साम्य असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त अधीक्षक शैलेश बलकवडे व सुनीता साळुंके-ठाकरे या वेळी उपस्थित होते.
सीबीआय चौकशीची नामुष्की टळली
आरोप-प्रत्यारोप आणि सामाजिक दबावाला तोंड देत पोलिसांनी संयमाने या प्रकरणाची तड लावली आणि तपास सीबीआयकडे सोपविण्याची नामुष्की टाळली. या हत्याकांडाविरोधात झालेल्या आंदोलनांमुळे तपासात अडथळे आले हे काही प्रमाणात खरे असले तरी लोकशाहीत लोकांना आंदोलनाचा अधिकार आहे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी सांगितले. पोलीसच छळ करत असून गुन्ह्य़ाच्या कबुलीसाठी पैसे देत असल्याच्या तक्रारी जाधव कुटुंबाने केल्या आहेत, याकडे लक्ष वेधता ते म्हणाले, की लोकशाहीत आरोपही होणारच. आम्हाला विचारणा झाल्यास त्याबाबत उत्तरे देऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javkhede khalsa murder case family dispute
First published on: 05-12-2014 at 05:38 IST