अकोले: दोन दिवसांत निळवंडे व आढळा धरणांमधून २ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात गेले. दरम्यान, जायकवाडी धरणाचा पाणी साठा ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी यावर्षी पाणी सोडावे लागणार नाही, हे निश्चित झाले आहे.निळवंडे धरणाचा पाणी साठा सोमवारी सकाळी ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाला. त्याच वेळेला पश्चिम भागात सुरू असणारा मुसळधार पाऊस आणि भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात सोडले जात असणारे पाणी या मुळे निळवंडे धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू होती. त्या मुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून सोमवारी सकाळपासून प्रवरा नदी पात्रात २ हजार ७८० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्गाचे प्रमाण टप्पा टप्प्याने वाढवीत नेण्यात आली. सोमवारी सायंकाळी निळवंडेमधून १३ हजार ९९४ क्युसेक विसर्ग सुरू होता.

मंगळवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ९७८ दलघफू पाणी निळवंडेतून प्रवरा नदीत सोडण्यात आले. तर त्या नंतरच्या चोवीस तासांत म्हणजे बुधवार सकाळपर्यंत ९२० दलघफू पाणी धरणातून बाहेर पडले. म्हणजेच अठ्ठेचाळीस तासांत १ हजार ८९८ दलघफू पाणी निळवंडे धरणातून सोडले गेले. याच दोन दिवसात पूर्ण भरलेल्या आढळा धरणातून ८२ दलघफू आणि ४३ दलघफू असे १२५ दलघफू पाणी नदी पात्रात पडले. ही आढळा नदी संगमनेरजवळ प्रवरा नदीला येऊन मिळते. या शिवाय म्हाळुंगी नदीचे पाणी तसेच विठे, चितळवेढे परिसरातील ओढ्याचे पाणीही प्रवरा नदीत मिळत होते. त्या मुळे या अठ्ठेचाळीस तासांत दोन टीएमसीपेक्षा जास्त पाणी प्रवरा नदीमधून जायकवाडीकडे वाहिले. अजूनही प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

निळवंडे धरणातून सकाळी ८ हजार २५ क्युसेक विसर्ग सुरू होता. सायंकाळी तो ५ हजार ७०० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. सकाळी आढळा नदीचा विसर्ग १९८ क्युसेक आणि भोजापूर येथील म्हाळुंगीचा विसर्ग ८१० क्युसेक होता. सकाळी ओझर येथील बंधाऱ्यावरून १२ हजार ६१३ क्युसेक पाणी प्रवरा नदी पात्रात पडत होते.

जिल्ह्याच्या उत्तर भागाचे लक्ष लागलेल्या जायकवाडी धरणात सकाळी उपयुक्त पाणी साठा ६३.१७ टक्के झाला होता. शिवाय गोदावरीतून ३२ हजार ६९० क्युसेक पाणी जायकवाडीकडे येत होते. जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा ६५ टक्के झाल्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याप्रमाणे जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची जिल्ह्यावर असणारी टांगती तलवार आता दूर झाली आहे.

भंडारदरा पाणी साठा ७ हजार ७३१ दलघफू. (७०.०३ टक्के)

विसर्ग ३ हजार ३४८ क्युसेक

निळवंडे पाणी साठा ६ हजार ८४१ दलघफू (८२.१४ टक्के)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विसर्ग ५ हजार ७०० क्युसेक