राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जितेंद्र आव्हाडांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांची समजूत घालण्यासाठी तातडीने सांगलीहून आले आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटलांनी मोठा खुलासा केला आहे.

यावेळी जयंत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांचा एका कार्यक्रमातला जुना व्हिडीओ सादर केला आहे. संबंधित कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेचा उल्लेख ‘बहीण’ असा करताना दिसत आहेत. संबंधित महिलेचा ‘हमारी बहन मुंबईसे आती है’ असा उल्लेख आव्हाडांनी केला आहे. हा व्हिडीओ जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत सादर केला आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाडांची समजूत घालण्यासाठी मी येथे आलो आहे. मी सांगलीवरून येत असताना प्रवासात काही व्हिडीओज पाहिले. दरम्यान, काहीजणांनी मला इतर माहिती उपलब्ध करून दिली. अलीकडेच जितेंद्र आव्हाड आपल्या मतदार संघातील एका कार्यक्रमाला गेले होते. ज्या भगिनींने जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच महिलेसोबत जितेंद्र आव्हाड एका व्यासपीठावर आहेत. यावेळी भाषण करताना आव्हाडांनी संबंधित महिलेचा उल्लेख ‘भगिनी’ असा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही स्त्रीबद्दल जितेंद्र आव्हाड कशी भावना व्यक्त करतात, हे आपल्याला या व्हिडीओमधून लक्षात येईल. हा व्हिडीओ नेमक्या याच महिलेबद्दल आहे. आव्हाडांनी त्या महिलेचा उल्लेख ‘हमारी बहन मुंबईसे आती है’ असा केला आहे. त्याच भगिनी काल अत्यंत गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक खासदाराला गर्दीतून मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे जाण्यास मदत केली. त्यानंतर आव्हाड पुढे वळताच या महिला पुढे आल्या. यावेळी ‘एवढ्या गर्दीत कशाला येताय, साईडला जावा’ असं भाष्य करून आव्हाड पुढे निघून गेले. यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह कृती नव्हती. तरीदेखील त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याचं आश्चर्य वाटतं. त्याच्याविरोधात ३५४ कलम लावण्यात आलं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.