दिवा विझताना जसा फडफडतो, तशी महायुती सरकारची अवस्था आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याच्या आरोपांवरूनही त्यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. जयंत पाटील यांनी आज विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा – “…म्हणून हा पळपुटेपणा शिंदे सरकारने केला आहे”, पुरवणी मागण्यांवरून जयंत पाटलांचं टीकास्र!

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

“बादशाहच्या मनात आलं तर हिट अॅंड रन प्रकरणात २५ लाखांची मदत १० लाखांवर आली. बादशाहच्या मनात आलं तर क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी दिले. शेवटच्या काही दिवसांत या सरकारला असे निर्णय जाहीर करायची गरज वाटू लागली आहे. दिवा विझताना जसा फडफडतो, तसा हा प्रकार आहे. महायुती सरकारची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी झाली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच महाराष्ट्रात लोकसभेनंतर विधानसभेतही महायुतीचा पराभव होणार आहे”, असेही ते म्हणाले.

समृद्धी महामार्गावरील भेगांवरूनही केली लक्ष्य

पुढे बोलताना समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याच्या आरोपांवरूनही त्यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं. “समृद्धी महामार्ग असेल किंवा अटल सेतू, कोस्टल रोड, असे विविध रस्ते करताना ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च अपेक्षित होता, अशा ठिकाणी शंभर रुपये या सरकारने खर्च केले. समृद्धी महामार्गने महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळी निर्णय घेणाऱ्यांची समृद्धी आणली आहे. आज समृद्धीच नाही, तर इतर रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत, आम्ही त्याबाबत बोललो, तर प्रकल्पांना बदनाम करत असल्याचा आरोपा आमच्यावर होतो. मात्र, तथ्य समोर आणणं हे विरोधकांचे काम आहे”, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – अजित पवारांचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाले, “जयंतरावांना घेऊन जायला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरवणी मागण्यांवरून शिंदे सरकारवर टीकास्र

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सभागृहात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरूनही शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं. “दोन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतरही सरकारला ९४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडाव्या लागतात, हा सरकारच्या अर्थव्यवस्थापनातील गोंधळ आहे”, असेही ते म्हणाले.