दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवादयात्रा गेल्या आठवडय़ामध्ये अपेक्षेप्रमाणे उत्साहात पार पडली. जनसंवादाबरोबरच पक्षविस्तार हा हेतू समोर ठेवून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी परिवार संवादयात्रेचे आयोजन केले होते. मात्र, या यात्रेत परिवारातीलच युवा नेत्याची छबी जिल्ह्यासमोर राहील याची व्यवस्था करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा या विधानसभा निवडणुकीत राजकीय मैदानावर प्रवेश निश्चित मानला जात असताना जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांची राजकीय मैदानातील सुरुवातही होणे गरजेचे असल्याने त्यांची छबी राजकारणाच्या व्यासपीठावर अग्रभागी राहील याची दक्षता या परिवार संवादयात्रेदरम्यान घेण्यात आल्याचे प्रकर्षांने दिसून आले.

Shivsena Thane, BJP alliance candidate Thane,
अन् महायुतीचा मुहूर्त चुकला, ठाण्यातील स्वागत यात्रेत यंदा शिवसेना भाजप युती उमेदवाराविनाच
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

दोन वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली असल्याचे या संवादयात्रेच्या निमित्ताने प्रकर्षांने जाणवले. राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करीत असताना नवीन कार्यकर्त्यांची आवक केली जात असताना आपल्या वारसदारांची सोयही व्यासपीठावर व्हायला हवी हीच संकल्पना या वेळी दिसून आली. संवादयात्रेच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर प्रदेशाध्यक्षासोबत युवा नेतृत्व म्हणून प्रतीक पाटील या वारसदाराचे लाँचिंग धूमधडाक्यात करण्यात आले.

याचीच परिणती म्हणून सांगलीत झालेल्या संवादयात्रेच्या सभेत प्रतीक पाटील यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. ही मागणी उत्स्फूर्त होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील असा होरा बहुतेकांचा आहे. किमान विद्यमान सदस्यांची तर तीच भूमिका असणार आहे. जिल्ह्य़ात भाजपकडे दोन जागा असून राष्ट्रवादीकडे तीन, काँग्रेसकडे दोन आणि शिवसेनेकडे एक जागा आहे. जागावाटपात या जागा त्या त्या पक्षाला मिळतील यात शंका नाही. महाविकास आघाडीने गमावलेल्या सांगली व मिरज या जागा जिंकण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. यापैकी जिल्ह्याचे केंद्र असलेली सांगलीची जागा काँग्रेसकडे आणि मिरजेची जागा गेल्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे होती. आता पुन्हा ती काँग्रेसच्या वाटय़ाला जाईल. मात्र, महापालिकेत ज्या पद्धतीने कमी सदस्यसंख्या असताना महापौर पद राष्ट्रवादीने पटकावले, त्याच पद्धतीने सांगली, मिरजेच्या जागेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा राहणार आहे.

इस्लामपूर हा जयंत पाटलांचा हक्काचा मतदारसंघ. सहकारी संस्थांच्या माध्यमातून बांधणीही मजबूत असली तरी विरोधकांमध्ये ऐक्य होणार नाही याची दक्षता घेत या मतदारसंघावर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघामध्ये मुलगा प्रतीक पाटील यांना राजकीय चाल द्यायची झाली तर सुरक्षित मतदारसंघाची गरज लाभणार आहे. त्या दृष्टीने सांगलीची जमीन चांगली कसदार वाटली तर नवल वाटायला नको. मात्र, खरा अडसर वसंतदादा गटाचा राहणार आहे. दादा गटाला दिल्लीची खासदारकीची जागा दिली तर सांगलीवरचा काँग्रेसचा हक्क दुबळा ठरू शकतो असा होरा असला तरी विधानसभेसाठी काँग्रेसनेही तयारी ठेवली असल्याने राष्ट्रवादीला जागा मिळेलच असे नाही.

इस्लामपूर मतदारसंघातून राजकीय वारसदार आणि तोही घरचाच असावा अशी बांधणी सध्या तरी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधी असला तरी तोपर्यंत राजारामबापू कारखान्यात निवडणुकीच्या माध्यमातून वारसदाराचा राजकीय प्रवेश सुलभ करण्याची तयारी आहे. येत्या दोन महिन्यांत या निवडणुकीचे सोपस्कार पार पडतील. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुलाचे लाँचिंग मतदारासमोर केले जाईल. मात्र तोपर्यंत विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत मौनच पाळणे पसंत केले जाईल.

जयंत यांचे पुत्र प्रतीक यांना सांगली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी असा आग्रह सांगलीच्या संवादयात्रेत करण्यात आला. तत्पुर्वी विटा, पलूस, जत, मिरज येथील संवादयात्रेच्या निमित्ताने प्रतीक पाटील यांची छबी मतदारासमोर ठळकपणे राहील याची व्यवस्था करण्यात आली. कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये झालेली संवादयात्रेची बैठक ही आबांच्या गावात अंजनीमध्ये घेण्यात आली. आरआर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनाही व्यासपीठावर घ्यावे लागेल, त्यांच्या व प्रतीक पाटील यांच्या भाषणाची तुलना होऊ शकते हे ओळखून व्यासपीठावर बैठक व्यवस्था न करता दोघांनाही समोरच्या रांगेत आसनस्थ करण्यात आले. रोहित पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार असतील याची घोषणा आबांच्या पश्चात पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनीच केली असल्याने आपल्या वारसदाराचे ज्येष्ठत्व मागे पडू शकते ही भीती आताच जयंत पाटलांना ग्रासू लागली आहे. यातूनच हा पंगतीप्रपंच मांडण्यात आला असून संवादयात्रेचे निमित्त आणि वारसदाराचे लाँचिंग पुढच्या राजकीय वारसदारांसाठीच होते की जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी होते हे मात्र जाणकार चांगलेच ओळखून आहेत.