अहिल्यानगरः गुजरातमधील सराफ व्यापाऱ्याच्या शिर्डीतून पळवलेल्या सुमारे ३.२६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे २.५ कोटींचे दागिने पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले. मात्र, आरोपी अद्याप पसारच आहे. आरोपीच्या भावाने राजस्थानमधून आणून दागिने अहिल्यानगरमध्ये पोलिसांकडे सुपूर्द केले. सुमारे ७५ लाखांचे दागिने अद्यापि मिळालेले नाहीत.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भातील माहिती दिली. अतिरिक्त अधीक्षक वैभव कलबुर्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर आदी या वेळी उपस्थित होते. गेल्या १३ मे रोजी ही चोरी शिर्डीत झाली होती. या घटनेतील आरोपी सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौघटन, बारमेर, राजस्थान) हा फरार आहे; तर मुंबईत कापड दुकानात काम करणारा त्याचा भाऊ रमेशकुमार राजपुरोहित याने दागिने राजस्थानमधून आणून येथे पोलिसांच्या हवाली केले. होलसेल सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करणारे विजयसिंह वसनाजी खिशी (आवाल गुमटी, अमिरगढ, बनासकाटा, गुजरात) यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती.
आरोपी सुरेशकुमार राजपुरोहित हा व्यापारी खिशी यांच्याकडे चालक म्हणून कामास होता. खिशी हे शिर्डीतील हॉटेलमध्ये थांबले असताना तेथून चालकाने दागिने पळवले होते. पोलीस पथकाने आरोपी सुरेशकुमार राजपुरोहित याचा पुणे, मुंबई परिसरात शोध घेतला. शिर्डी परिसरातही त्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळले नाही. त्यामुळे राजस्थानमधील मूळ गाव इब्रे का ताला, उदयपूर, जोधपूर भागात पथके पाठवली गेली. आरोपीच्या नातेवाइकांकडे चौकशीत आरोपी व त्याच्याकडील दागिन्यांची माहिती मिळाल्यास कळवण्यास बजावण्यात आले. त्यानुसार आरोपीचा भाऊ सुरेशकुमार राजपुरोहित हा काल, शुक्रवारी २ कोटी ५० लाख ५९ हजारांचे दागिने घेऊन नगरमध्ये पोलिसांकडे आला.