उद्धव ठाकरे यांनी ज्या एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्या मुख्यमंत्री पदावर भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख असणारे एकनाथ शिंदे हे सायंकाळी साडेसात वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा राजभवनामधील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेमुळे ठाण्याची शिंदे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि महाविकास आघाडीतील सहकारी असणारे मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आनंद व्यक्त केलाय. ट्विटरवरुन त्यांनी यासंदर्भातील पहिली प्रतिक्रिया नोंदवलीय.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२”

कळवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुचर्चित खारेगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यापासून ते ठाणे महानगरपालिकेली राजकारणुळे शिंदे आणि आव्हाड जोडी सत्तेत असूनही कायमच चर्चेत रहीली. आज याच जोडीपैकी शिंदे यांची थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने आव्हाड यांनी आनंद व्यक्त करत ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिलीय. “एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.अनेक वर्ष एकत्र काम केले म्हणून मला आनंद आहे…खूप खूप शुभेच्छा”, असं आव्हाड म्हणालेत.

आघाडीत बिघाडीचं नातं…
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात नवी मुंबईतील ३६३ कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाच्या निमित्ताने ४०० झाडांची कत्तलीच्या नावाखाली झालेला वाद नुकताच चर्चेत होता. या वादामुळे शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी झाल्याचं पहायला मिळालं होतं. याशिवाय शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना ठाणे व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आघाडी नकोच असल्याच्या चर्चेने ठाण्यातील आघाडीच्या चर्चेत बिघाडीचा मीठाचा खडा पडला होता. महाविकास आघाडीतील ठाण्यातील शिंदे-आव्हाड या दोन वजनदार मंत्र्यांमधील बिघाडीचे अनेकदा खटके उडत राहिल्याचं पहायला मिळालं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकमेकांचं कौतुक…
अनेक कार्यक्रमांमध्ये हे नेते एकमेकांचं तोंडभरुन कौतुक करतानाही दिसले. “एकनाथ शिंदे आणि आमची मैत्री राजकारण पलीकडची आहे, त्यात एक अबोलपणा आहे,” असं आव्हाड याच वर्षी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या खारीगाव उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळी म्हणाले होते. “आमची मैत्री आहे हे खरे आहे, हे सर्वांसमोर खुले आहे. पोटात एक आणि ओटात एक असे आम्ही कधीच वागत नाही. निवडणुकांमध्ये आम्ही दोघे पक्षाचे काम करतो पण निवडणूक संपल्यानंतर कोणतीही अडी ठेवत नाही,” असं उत्तर शिंदेंनी दिलेलं.