आमदारांसाठी राज्य सरकार मुंबईत घरांची उभारणी करणार, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घोषणेवरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मोठा गहजब उडाल्याचं पाहायला मिळालं. खुद्द राज्य सरकारमधल्याच आमदार आणि मंत्र्यांनी आपल्याला मोफत घर नको असल्याचं जाहीरपणे म्हटल्यानंतर राज्य सरकारकडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर स्पष्टीकरण देणारी भूमिका जाहीर केली. यानंतर या मुद्द्यावर पडदा पडणं अपेक्षित असताना अजूनही त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडून प्रतिक्रिया येतच आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी केलेल्या ट्वीटवर आव्हाडांनी सूचक शब्दांत केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना राज्यातील ३०० आमदारांना घरं उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यावेळी काही अपवाद वगळता बहुतांश आमदारांनी विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र, सामान्य जनतेमधूनच नाराजीचा सूर उमटू लागल्यानंतर त्यावर आमदारांनी देखील मोफत घर नको असल्याची भूमिका मांडायला सुरुवात केली.

जितेंद्र आव्हाडांच्या स्पष्टीकरणानंतरही संभ्रम कायम?

मात्र, मोफत घरांच्या मुद्द्यावरून टीका होऊ लागल्यानंतर अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना ही घरं आमदारांना मोफत मिळणार नसून त्यासाठीचा खर्च त्यांच्याकडून आकारण्यात येणार असल्याचं नमूद केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेविषयी काहीशी स्पष्टता आल्यानंतर त्यावर आज काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी पुन्हा ट्वीट करून आपल्याला फ्लॅट नको असल्याचं ट्वीट केलं.

“माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात हजारो लोकांना घरं मिळत नसताना आणि ते वाईट अवस्थेत आयुष्य काढत असताना मला महाराष्ट्र सरकारकडून घराची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडजी यांना माझी विनंती आहे की त्यांनी हा पैसा आमदारांसाठी घरं बांधण्याऐवजी अशा लोकांना घरं बांधून देण्यासाठी वापरावा”, असं ट्वीट झिशान सिद्दिकी यांनी दुपारी केलं होतं. या ट्वीटवर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देतानाच सिद्दिकी यांना सूचक शब्दांत टोला देखील लगावला आहे.

आव्हाडांचं सूचक उत्तर

“तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची १० घरं आहेत. पण ही योजना फक्त ग्रामीण महाराष्ट्रातील आमदारांसाठी आहे, मुंबईतील आमदारांसाठी नाही. मला वाटलं तुम्हाला चांगली माहिती असेल. कुणालाही मोफत घर मिळणार नाहीये. मला आशा आहे की आता तरी तुम्हाला हे स्पष्ट झालं असावं”, असं ट्वीट करून जितेंद्र आव्हाडांनी झिशान सिद्दिकी यांना उत्तर दिलं आहे.

मोफत घरांच्या घोषणेवर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांकडून देखील आक्षेप घेतला जात असताना विरोधकांनी हा टीकेचा एक मुद्दा देखील केल्याचं दिसून आलं आहे.