ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीसंदर्भात आणि नेतेमंडळीबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पीत नाहीत, हे सांगा”, असा सवाल उपस्थित करून बंडातात्या कराडकर यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. त्यासोबतच त्यांनी अनेक दिग्गज नेतेमंडळींवर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बंडातात्या कराडकर यांच्या विधानावर निशाणा साधला आहे.

“किर्तनकार आहे की नाही हाच प्रश्न”

“एका किर्तनकाराच्या तोंडी अशी भाषा येणं म्हणजे तो किर्तनकार आहे की नाही हा प्रश्न उभा राहतो. बंडातात्या कराडकर, यांची मुळं कुठे आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले. यात मनावर घेण्यासारखं काही नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“…ही वारकऱ्यांची संस्कृती नाही”

बंडातात्या कराडकर यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करून केलेल्या टीकेवर देखील जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला. “पंकजा ताई असो किंवा सुप्रियाताई असो..एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की ते कोण आहेत”, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा; बंडातात्या कराडकरांचं जाहीर आव्हान

“नेत्यांची मुलं दारु पितात, माझ्याकडे पुरावे”

बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काही जणांची नावंदेखील घेतली आहेत. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितला तर सिद्ध करु शकतो असंही ते म्हणाले आहेत. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.