Jitendra Awhad vs Prakash Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते “माझ्या बाबतीत अर्ध सत्य सांगितलं जातं पण, मी लहानपणापासूनच पूजा करतो. मुख्यमंत्री असताना तीन ते चार वेळा पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा केली, त्याचबरोबर तुळजापूरलाही जाऊन पूजा करतो. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. महाजन म्हणाले होते की “शरद पवार म्हणाले लहानपणी देवपूजा करत होतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते त्यांची मुंज झालेली पण दाखवू शकतात.”

प्रकाश महाजन म्हणाले, “शरद पवारांच्या लक्षात आलंय की हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करता येत नाही! जितेंद्र आव्हाडांना तुळजाईचं मंदिर बांधावं लागलं ही हिंदूंची ताकद आहे.” यावर आता आमदार आव्हाडांनी पलटवार केला आहे. आव्हाड म्हणाले, “यात ताकदीचा काय प्रश्न आहे? आपणा सर्वांच्या माहितीकरिता सांगू इच्छितो, २००४ साली हे मंदिर उभं राहिलं. परंतु, हे रहदारीच्या रस्त्यात असल्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त व न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार सदर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस गेली अनेक वर्ष माझ्या मनात होता. कदाचित हे राज्यातील पहिले असे मंदिर असेल ज्यात बांधकामाची तसेच मंदिर वापराची परवानगी घेतली आहे. त्यामागे माझी तुळजा भवानी मातेवरील नितांत श्रद्धा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी हिंदू आहे हे सांगायला कुठल्या महाजनची गरज नाही”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “समस्त बहुजनांची उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी आईचे हे प्रतितुळजापूर देऊळ असंख्य भक्तांचे शक्तीस्थान ठरेल. इतिहास साक्षी आहे, छत्रपती शिवरायांचे देखील तुळजाभवानी मंदिर प्रेरणास्थान होते. आई तुळजाभवानीनेच उभ्या महाराष्ट्राला मोगलाई विरोधात उभे ठाकण्याची ताकद दिली. आमच्यासारख्या बहुजनांना तुमच्यासारख्यांनी पिढ्यानपिढ्या वंचित ठेवलं. शिक्षण, पाणी, न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाहीये. ते तुम्हालाच लखलाभ असू द्या. आणि हो आपणही संपूर्ण कुटुंबासहित उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. आपले मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे स्वागतच असेल. जय तुळजाभवानी! तसेच, मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजन ची गरज नाही”