काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओवरून गंभीर आरोपही करण्यात आले. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. यावरून राजकारण तापलेलं असतानाच शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वेगळंच ‘ट्विटर वॉर’ सुरू झाल्याचं दिसत आहे. रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सगळ्याला सुरुवात झाली ती शीतल म्हात्रेंच्या २५ मार्च रोजी केलेल्या एका ट्वीटपासून!

“हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा?”

शीतल म्हात्रेंनी २५ मार्च रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट केला होता. हा बॅनर उर्दू भाषेत छापला होता. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? उध्वस्त सेना..खांग्रेसची चमचेगिरी”, असं ट्वीट शीतल म्हात्रेंनी केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेसंदर्भातला हा बॅनर होता.

“दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”

दरम्यान, यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे गटाचा एक बॅनर ट्वीट केला. हा बॅनरही उर्दू भाषेत असून त्यावर एकनाथ शिदेंसह अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे. “याच्यावर बोला ताई. खास तुमच्या माहितीसाठी. कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”, असं ट्वीट आव्हाडांनी केलं.

या ट्वीटवर पुन्हा शीतल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिलं. “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्वीट चांगलंच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असं ट्वीट शीतल म्हात्रेंनी केलं. त्यावर प्रत्युत्तरादाखल आव्हाडानी केलेल्या ट्वीटमध्ये “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारं कृत्य मी करत नाही. आठवतंय ना? काय दे ढुं***, काय तो दांडा.. धूर कुठून निघाला?” असा खोचक सवाल करण्यात आला.

“पवारांची भाकरी, उद्धवजींची चाकरी”

दरम्यान, यावर पुन्हा एकदा शीतल म्हात्रेंचं ट्वीट आणि जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर आलं. “पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी.लगे रहो भाईजान”, असं म्हात्रेंनी म्हटल्यानंतर त्यावर “त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, असं खोचक ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे राज्यात इतर मुद्द्यांवरून राजकारण तापलेलं असताना जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात वेगळंच ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे.