देशात करोनामुळे आर्थिक संकट गंभीर बनलं आहे. केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं असलं, तरी देशाचा विकासदर घसरणार असल्याचे अंदाज रिझर्व्ह बँकेसह विविध संस्थांनी व्यक्त केले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लॉकडाउनच्या काळात देशातील आर्थिक परिस्थितसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्यावरून राहुल गांधी यांना ट्रोल केल जात असून, ट्रोल करणाऱ्यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात देशातील आर्थिक स्थिती गंभीर बनली. देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार सरकारला वेगवेगळ्या विषयांवर सूचना करत आहेत. त्याचबरोबर अर्थतज्ज्ञांसह उद्योगपतींशी संवाद साधून या अर्थ संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजनांवर भर देत आहेत. दुसरीकडं राहुल गांधी यांना सातत्यानं ट्रोल केल जात आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं आहे.

“राहुल गांधींवर टीका करणं ट्रोल आर्मीनं सुरू ठेवावं. पण, राहुल गांधी जे बोलत आहेत, ती वस्तुस्थिती आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांनी मांडलेल्या मतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जेव्हा मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यात गुंग होते, तेव्हा करोनावर बोलणारे ते पहिले नेते होते,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

आणखी वाचा- लॉकडाउनने ‘हे’ शिकवलं तर सार्थक झालं – राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी गरीब आणि मजुरांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करण्याची मागणी केली होती. पैशाच्या स्वरूपात मदत दिली, तर अर्थचक्र सुरू राहिलं, असंही राहुल गांधी म्हणाले होते.