मागील काही दिवसांपासून महापुरूषांवरील वक्तव्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असे विधान केले. याच विधानामुळे राज्यात भाजपा आणि शिंदे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीला खिंडीत गाठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंजेबजी असा केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो ट्वीट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली असे ट्वीट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्वीट केले?

आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो प्रदर्शित केला आहे. या फोटोमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिसत आहेत. याच फोटोचा आधार घेत आव्हाड यांनी ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ असे खोचक ट्वीट केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना बावनकुळे यांनी औरंगजेबाचा औरंगजेबजी असा उल्लेख केला होता. “जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे… त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत,” असे हिंदीमधून बोलताना बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे वाद निर्माण झाल्यानंतर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. “क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘ जी ‘ म्हणू शकत नाही. औरंग्या तो पापी औरंग्याच!. क्रूरकर्म्या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना, पत्रकाराने हिंदीतून प्रश्न विचारला. या प्रश्नाला हिंदीतून उत्तर देत असताना मी ‘जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबजी ला क्रूर मानत नाहीत‘असे उपरोधाने म्हटले,” असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले होते.