ज्यांना शिवसेनेत जायचे आहे, त्यांना मार्ग मोकळा आहे, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादीचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना लगावला.
राष्ट्रवादीत राहून फोडाफोडीचे तंत्र करू नका. त्यांना राष्ट्रवादीतच राहायचे असेल तर शरद पवार यांचे नेतृत्व मानून इमानेइतबारे राष्ट्रवादीची सेवा करावी लागेल असा इशाराही दिला. ते विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, प्रदेश सरचिटणीस शिवराम दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, जिल्हा युवक अध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद रेगे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना लोकसभा निवडणूक काळातच निलंबित केल्याचे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दीपक केसरकर यांना सन्मान दिला ते त्यांनी केव्हा सांगितल्याचे आठवत नाही, पण पक्षाने अन्याय केल्याचे ते सांगत आहेत असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष्मणरेषा आखून दिली होती. ती पार केल्यावर मानसन्मानाची भाषा आम. केसरकर यांच्या तोंडून शोभत नाही. त्यांनी पवारसाहेबांनाच आव्हान दिले. शरद पवारसाहेबांना आव्हान देणाऱ्या आम. दीपक केसरकर यांच्याबाबत काय बोलणार, मी लहान माणूस आहे असे आव्हाड यांनी बोलताना स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या तिन्ही जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. या प्रश्नावर बोलताना आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात २८८ जागा मागणार आहे. पण या पक्षाच्या भूमिका झाल्या, त्या आघाडीच्या नव्हे असे आव्हाड म्हणाले.
मालवण नगर परिषद व आंबड्र जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळविला. राष्ट्रवादी नको वाटणाऱ्या ग्रुपने आपली ताकद अजमावली आहे असे सांगत आव्हाड यांनी आम. केसरकर यांच्यावर टोला हाणत मीच म्हणतो ते खरे, आपल्याच जिवावर जिल्हा चालतो असे भासविण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडीचा धर्म पाळण्याची पक्षाची भूमिका होती, पण एबी फॉर्म मॅनेज करून आणल्याची टीका आव्हाड यांनी केली.
आंधळे नसताना डोळ्यावर पट्टी लावून फिरणाऱ्यांनी जिल्ह्य़ाकडे पाहावे. एक लाट आली म्हणून अशा लाटा पुन्हा येत नाहीत असे ना. आव्हाड यांनी आम. केसरकर यांना टोला हाणला. पाऊस पडत नसल्याने सरकार योजना आणेल, दुबार पेरणीला मदत करेल असे सांगून जिल्ह्य़ातील रुग्णालयांचे प्रश्न सोडवू असे ते म्हणाले. जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय हवे, त्यासाठी पालकमंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा करू असे त्यांनी सांगितले.