आळंदीचे विश्वनाथ जोशी गुरूजी, पुण्याच्या सुचेता भिडे-चाफेकर, आणि नाशिकचे क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांना येथे पूर्णवाद परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘पूर्णवाद विद्या कला नीती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदुस्थान हार्डीस्पायसरचे व्यवस्थापकीय संचालक अशोक राजवाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
येथील प्रसाद मंगल कार्यालयात विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वेदशास्त्रातील अग्रणी इंदूरचे प्रल्हाद गुरू पारनेरकर व त्यांचे सहध्यायी पुरूषोत्तम काका भडकमकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘पूर्णवाद वेदमूर्ती पुरस्कार’ आळंदीचे वेदशास्त्रसंपन्न विश्वनाथ जोशी गुरूजी यांनी तर, इंदूरचे संगीत शिरोमणी पं. राजाभेैया पूंछवाले आणि नाशिकचे पं. गजाननबुवा सरवटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘पूर्णवाद संगीत उपासक’ पुरस्कार पुण्याच्या सुचेता भिडे-चाफेकर यांनी स्वीकारला. नाशिकचे समाजभूषण शं. पु. जोशी तथा बापूसाहेब जोशी आणि अ‍ॅड. दादासाहेब राजेशिर्के यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘पूर्णवाद सत्यबोध समाजभूषण पुरस्कार’ नाशिकचे भीष्मराज बाम यांना देण्यात आला.
आपणास संस्कृती, परंपरेचा विसर पडत चालला असून पाश्चात्य उलट आपणास हे सर्व काही शिकवायला लागले आहेत. त्यामुळेच आज संस्कृती जपण्याची गरज आहे, असे मत यावेळी राजवाडे यांनी मांडले. आपण अद्याप हा पुरस्कार स्वीकारण्याइतकी उंची गाठू शकलेलो नाही, असे नमूद करत भीष्मराज बाम यांनी नवनवीन गोष्टींमधून चांगले जे असेल ते घ्यावे तसेच आदर्श परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले. संतसेवा आणि संतदर्शन ही आपल्यासाठी मुक्तव्दारे आहेत. सद्गुरूंचे चरण आपल्या मस्तकाला लागत नाहीत, तोपर्यंत खरे ज्ञान मिळणे कठीण असल्याची भावना पुरस्कार स्वीकारल्यानंतर जोशी गुरूजींनी व्यक्त केली.  सुचेता भिडे-चाफेकर यांना सायंकाळच्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवस्मृती आणि भरतनाटय़म यांचा नृत्याविष्कार त्यांनी सादर केला.