न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश

शहाबाज धरमतर येथील बंदर विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये जेट्टी बांधण्यासाठी सरकारी परवानगीच्या बनावट कागदपत्रांप्रकरणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल जयंत पाटील व तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश  न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.  मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या फिर्यादीचे  फौजदारी खटल्यामध्ये रूपांतर करून हे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी शेतकरी द्वारकानाथ पाटील, दर्शन जुईकर यांनी अलिबाग न्यायदंडाधिकारी  यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यावर अलिबाग येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तक्रारीमधील आरोपांनुसार भारतीय दंड विधान कलमान्वये आरोपींना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होऊ शकेल. आरोपींनी संगनमत करून बनावट सरकारी कागदपत्रे बनविली असल्याच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळत असल्याचे मतही नोंदविले आहे.

प्रकार काय?

शहाबाज धरमतर येथील बंदर विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मोरा बंदर समूहाचे तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्या सहीची बनावट कागदपत्रे बनवून बंदर उद्योगासाठी अनधिकृत जेट्टय़ा व त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून सुमारे ५६ कोटींचे कर्ज मिळविल्याप्रकरणी रायगड जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

दाखल फिर्यादीत खोटे सरकारी दस्तऐवज तयार करून ते खरे आहेत,असे भासवून अनधिकृत बांधकाम अधिकृत केल्याचा व राष्ट्रीयीकृत बँकेकडून कोटय़वधींचे कर्ज घेतल्याचा आरोप तक्रारदार यांनी फिर्यादीत केला होता. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आ.जयंत पाटील, नृपाल जयंत पाटील, तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरुद्ध  गुन्ह्य़ांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

‘न्यायालयाच्या आदेशाची प्रत बघितल्याशिवाय यावर बोलणे योग्य होणार नाही, पीएनपी कंपनीच्या संचालक पदाचा मी यापूर्वीच राजीनामा दिला आहे, त्यामुळे या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, काही लोक माझी बदनामी करण्यासाठी अशा तक्रारी करतात, पण त्याला मी फारसे महत्त्व देत नाही.’

जयंत पाटील, शेकाप आमदार