अकोले: ‘८ जुलै’ हा ‘गोनीदा’ या नावाने सुपरिचित असणारे दिवंगत साहित्यिक गोपाल नीलकंठ दांडेकर यांचा जन्म दिवस. मात्र गोपाल हे काही त्यांचे मूळ नाव म्हणजे आई -वडिलांनी ठेवलेले नाव नाही. त्यांचे मूळ नाव होते आत्माराम. ‘गोनीदा’ तेराव्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी म्हणून घरच्यांना न सांगता पळून गेले होते. आपली मूळ ओळख लपविण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि आत्मारामचे गोपाल झाले. गोपाल हे नाव घेण्यास त्यांच्या अकोलेमधील वास्तव्याचा संदर्भ आहे.

ज्या अकोल्यातील वास्त्यव्यामुळे ते आत्मारामचे गोपाल झाले, त्या अकोल्यात मात्र त्यांच्या कोणत्याच स्मृती नाहीत. काही काळापूर्वी मराठी अध्यापक मंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गो. नी. दांडेकर वक्तृत्व स्पर्धा सुरू केली होती. मात्र तीन-चार वर्षांतच ती बंद पडली.

‘स्मरणगाथा’या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या नाव बदलाचा खुलासा केला आहे. ते लिहितात, “घरून पळून गेल्यावर ध्यानी आलं, हे पितृदत्त आत्माराम नाव कोणे एक क्षणी गोत्यात आणण्याची शक्यता आहे. कान धरून कोणी घरी देखील पोचवायचा. तेव्हा यात काहीतरी बदल करायला हवा. भ्रमण सुरू असताना कुणी विचारलेच, तर काय तोंडात येईल ते सांगून टाकीत असे. मग वाटलं की लटक्यातही काही सुसंगती हवी.

योगायोगाने नगर जिल्ह्यातल्या अकोल्याला दोन तीन वर्षे राहिलो. काम? गोरक्षणातल्या गाईचा गुराखी. गाई वळीत असता ध्यानी आलं, की गाई तर सांभाळतोच आहे. तर मग ‘गोपाल’ हे नाव काय वाईट आहे ? आणि आत्मारामचे गोपाल झाले. ”

मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या चळवळीत भाग घेण्यासाठी ते घरातून पळून मुंबईत आले. चळवळीचा जोर ओसरल्यावर अनेक कार्यकर्ते घरोघरी परतू लागले. पण ‘गोनीदा’ मात्र मुंबईतच थांबले. कामाच्या शोधात मुंबईत फिरत राहिले. मिळेल ते काम करीत मिळेल तेथे आश्रय घेत. काही दिवस मुंबईत काढल्यानंतर ते पुण्याला आले, नंतर पुण्याहून नाशिकला. नाशिक येथेच एका लग्न समारंभात अकोल्याचे क्रांतिकारक गणेश जगन्नाथ जोशी यांनी त्यांना हेरले आणि ते गोनिदांना अकोल्याला घेऊन आले. ‘गोनीदां’ना त्यांनी आपला मुलगा मानले.

गणेश जगन्नाथ जोशी हे अकोल्यातील बडे प्रस्थ होते. मोठ्या वाड्यात ते एकटेच रहात. गोरक्षणाचे काम करीत. त्यांच्या गोशाळेत चाळीस-पन्नास विविध प्रकारची जनावरे होती. या जनावरांची देखभाल करणे, शेतीचे काम करणे हे सर्व ‘गोनीदां’नी शिकून घेतले. गोरक्षणाची भिक्षा मागायला ते नियमितपणे जात. विविध पदे म्हणत गावातून फिरत.

गोशाळेतील गुरांचा त्यांना मोठा लळा होता. नावानिशी ते गुर ओळखीत. शेतातून गवताचे भारे घेऊन आणत. गोशाळेतील गुरे चरण्यासाठी खंडोबाच्या डोंगरावर नेली जात. भीमा नावाचा गडी हे काम करायचा. एकदा तो महिनाभर गावी गेला होता. तेव्हा गुरे चरायला नेण्याचे काम ‘गोनीदां’नी केले. भोवतालच्या परिसरातील चार-पाच मुलेही तेथे जनावरे घेऊन येत. या महिनाभरातल्या गुरे चरायला नेत असतानाच्या अनेक आठवणी गोनीदांनी स्मरणगाथामध्ये लिहून ठेवल्या आहेत.

अकोल्यात असतानाच गोनीदा कीर्तन करायला शिकले. एका नाटकातही त्यांनी काम केले. आपल्याला कायम अकोल्यात रहायचे आहे, हे त्यांनी गृहीत धरलं होते. मात्र, काकडी खाण्याचे निमित्त झाले आणि पोटफुगी होऊन गणेश जोशी निवर्तले आणि गोनीदांनी अकोले सोडले.

स्मरणगाथामध्ये त्यांच्या अकोल्यातील वास्तव्याच्या काळातील अनेक घडामोडींचा त्यांनी रसाळ भाषेत आढावा घेतला आहे. सांस्कृतिक, सामाजिक दस्तऐवजच आहे तो. अकोले सोडल्यानंतही ते अकोल्यात अनेकदा येऊन गेले. या भागातील गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी, कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे येणे होते. गणेश जगन्नाथ जोशी स्मृतीमंदिराच्या उद्घाटनासाठीही ते आले होते. काळाच्या ओघात त्या स्मृती मंदिराची इमारत पडून गेली.

ज्या अकोल्याने गोनीदांना गोपाल हे नाव दिले त्या अकोल्यात त्यांच्या वास्तव्याच्या कोणत्याही खुणा आता नाहीत. नवीन पिढीला याची माहितीही नाही. ते दोन वर्षे ज्या वाड्यात राहिले त्या वाड्यासमोरचा पिंपळ मात्र अजूनही जमिनीत घट्ट पाय रोवून उभा आहे.

स्मृती जतन कराव्यात

अकोले तालुक्यातील स्वातंत्र्यसेनानी आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील तत्कालीन जुलमी मामलेदार जाळल्या प्रकरणातील मुख्य आरोप ठेवण्यात आलेले कै. जगन्नाथ जोशी यांच्याकडे, कै. गोपाल नीलकंठ दांडेकर उर्फ अप्पा त्यांच्या ऐन तारुण्यात अकोले कमानवेस नजीक आगरगल्लीत राहण्यास होते. गुरे राखणे, वळणे, देवी उत्सव आखाडीतील नाटकात सवंगड्यांबरोबर काम करणे, नाटकं बसवणे असा गोनीदांचा छंद. कालांतराने ज्या गणेश जगन्नाथ स्मृती मंदिर अर्थात जुन्या अश्वत्थ पिंपळासमोर मराठी मुलींची जिल्हा परिषद शाळा भरत असे ती इमारतही जीर्ण झाली. पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र तेथे छोट्या जागेत वाचनालय अथवा ग्रंथालय सुरू करून त्यास गोनीदांचे नाव देऊन गणेश जोशींचेही स्मारक करावे, अशी कल्पना पूर्वीची ग्रामपंचायत आणि नंतर नगर पंचायतकडे केली होती. अद्याप पूर्तता नाही ! माझा व्यक्तिशः अनेकदा गोनीदांशी कारणपरत्वे पत्रव्यवहार झाला. रायपूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादासंदर्भात त्यांचेशी झालेला माझा पहिला पत्रव्यवहार, त्या साहित्यिक वादातून पुढे परिचय घडत गेला.- डॉ. सुनील शिंदे