काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यात नुकतीच बैठक पार पाडली. भाजपा विरोधात विरोधक एकत्र येण्यास सुरूवात झाली असल्याचं शरद पवार यांनी या भेटीनंतर सांगितलं होतं. दिल्लीत ही बैठक पार पडल्यानंतर राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवारांनी राहुल गांधींना उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा सल्ला दिला असल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधी पवारांचा सल्ला ऐकून या दोन्ही नेत्यांना भेटतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वेणुगोपाल आज (१७ एप्रिल) उद्धव ठाकरे यांचं मुंबईतलं निवासस्थान मातोश्री येथे आले होते. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर वेणुगोपाल म्हणाले की, “उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हाच निरोप घेऊन मी इथे आलो आहे.”

काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल म्हणाले की, विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही पाहिलंच असेल राहुल गांधी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटले. त्यानंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटले.

हे ही वाचा >> “काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन आलोय”, उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर के. सी वेणुगोपाल यांचं वक्तव्य, म्हणाले, “हुकूमशाहीविरोधात…”

दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींनी वेणुगोपाल यांना प्रश्न विचारला की, काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट कधी घेणार? त्यावर वेणुगोपाल म्हणाले की, “मी आणि उद्धवजींनी नुकतीच बातचित केली. मीच उद्धवजींना आत्ता विनंती केली आहे की, उद्धवजींनी दिल्लीत येऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घ्यावी. सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत सर्वांना माहितीच आहे. उद्धवजी दिल्लीत येऊन राहुल आणि सोनिया गांधींना भेटल्यानंतर नक्कीच राहुल गांधी देखील मुबईत येऊन उद्धव ठाकरेंना भेटतील.”

दरम्यान, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आता आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या.