अवैध धंद्यांना पायबंद घालण्याची मागणी करणाऱ्या कनगरावासीयांना जनावरांप्रमाणे झोडपल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आपली कातडी वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पळवाट शोधली. जनावराप्रमाणे बेदम मारहाण केलेल्या ५४ जणांपकी ४७ जणांना गुपचूप सोडून देण्याची नामुष्की पोलिसांवर आली. २४ तासांत ४७ ग्रामस्थांना सोडून देण्यात आले. उर्वरित चार दारूविक्रेत्यांसह ३ ग्रामस्थांना मात्र अजूनही डांबून ठेवले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे खापर वरिष्ठांवर फोडले जाऊ नये, म्हणून ३ पोलीस कर्मचारी व एका सहायक निरीक्षकाला निलंबित करण्यात आले.
दारूबंदी करावी, या साठी बेंबळी पोलीस ठाण्याकडे तगादा लावणाऱ्या कनगरा येथील महिला-पुरुषांना सोमवारी रात्रभर पोलिसांनी झोडपून काढले. पोलिसांचे हे वर्तन ग्रामस्थांना धक्कादायक ठरले. आपणास जबर मारहाण कशासाठी केली जात आहे, याचीही त्यांना कल्पना नव्हती. ग्रामस्थांनी पकडून दिलेल्या गावठी दारूचे पुरावे नष्ट करणाऱ्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी चोप दिला होता. आपल्या सहकाऱ्यांना ग्रामस्थांनी मारहाण केली, हा राग धरून गावातील प्रत्येक गल्लीत परेड करून घराचे दरवाजे तोडून ग्रामस्थांना अमानुष मारहाण करण्यात आली.
विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर यांच्या उपस्थितीत घडला. घडलेला प्रकार व ग्रामस्थांना मारहाणीमुळे झालेली गंभीर दुखापत समोर येताच पोलीस प्रशासन चांगलेच भांबावून गेले. रात्री उशिरा अटक केलेल्या ५४ पकी ४२ पुरूष व ५ महिलांना थातूरमातूर उपचार देऊन सोडून देण्यात आले. त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदविला नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. आमचा दोष नव्हता तर आम्हाला कशासाठी मारझोड झाली आणि २४ तास पोलीस कोठडीत डांबून ठेवले, असा प्रश्न या ४७ जणांनी विचारला आहे. यातील अनेकांना गंभीर दुखापत झाली. नांदेडचे पोलीस महानिरीक्षक जगन्नाथ यांनी गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार कनगरा येथे भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांनी घरात घुसून केलेली नासधूसही पाहिली. आता ते गृहमंत्रालयाकडे अहवाल सादर करणार आहेत.
विनोद तावडे, अर्चना पाटील खडाजंगी
विरोधी पक्षनेते विनोद तावडे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना, माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना यांनी तावडे यांना मध्येच टोकले. त्यामुळे या दोघांमध्ये ग्रामस्थांसमोरच बाचाबाची झाली. अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या जि. प. सदस्य आहेत.  आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये असलेला मुजोरपणा अधिकाऱ्यांपर्यंत मुरल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप तावडे यांनी केला. सत्ताधाऱ्यांमुळेच पोलिसांना बळ मिळत आहे. त्याच्या जोरावर सामान्यांना पोलीस प्रशासन वेठीस धरीत असल्याचे सांगताच, अर्चना पाटील यांनी निवडून आलेले आपले नवीन खासदार व पालकमंत्री काय करीत आहेत, हे अगोदार सांगा, असे तावडे यांना टोकले. मात्र, मी ग्रामस्थांशी बोलण्यास आलो आहे. आपणाला यात राजकारण करायचे नाही. ग्रामस्थांशी संवाद साधू द्या. मला आपल्याशी बोलण्यात रस नाही. आपण या गावच्या रहिवासी नाहीत, असा चिमटा तावडे यांनी काढताच अर्चना पाटील यांनी आपणही मुंबईचे नागरिक आहात. कनगऱ्याचे नाही, असे उत्तर दिले. हे होत असताना तावडे यांनी ग्रामस्थांनाच या ताईंना शांत करा, तरच मी बोलेन, असे आवाहन केले. ग्रामस्थांनी सावरासावर केल्यामुळे विनाकारण वाढलेला तणाव कमी झाला.