कर्जत: श्री गोदड महाराज रथयात्रेच्या उत्सव काळात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी शहर व्यापारी संघटनेने पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांना निवेदन देऊन केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष बिभीषण खोसे, पदाधिकारी महावीर बोरा, ॲड. योगेश भापकर, प्रसाद शहा, संतोष भंडारी, गणेश तोरडमल, सुरेश नहार, यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, कामिका एकादशी दिवशी, २१ जुलैला रथयात्रा उत्सव सुरू होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक येतात. मोठ्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यांच्या संरक्षणासाठी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवावा. दुकानांसमोर वाहने लावण्यास प्रतिबंध करावा, मेन रोडवर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करा, रथमार्ग, मंदिर परिसर आनंदनगरी, मेन रोड, बसस्थानक येथे बंदोबस्त ठेवावा.
गर्दीमुळे खिसेकापू, चोरी करणाऱ्या टोळ्या येतात व भाविकांची लूट करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. टवाळखोर शालेय विद्यार्थिनी व महिलांना उपद्रव करतात, त्याबाबत काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.