राहाता: कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २०२४-२५ च्या गाळप झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली. जिल्ह्यातील साखर कारखानदारीत हा सर्वाधिक दर असल्याचा दावाही त्यांनी केला.
कोपरगावमधील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याची ७२ वी वार्षिक सभा ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार काळे यांनी सांगितले, की गाळप हंगाम २०२४-२५ च्या गळीतास आलेल्या उसाला पहिले पेमेंट २ हजार ८०० रुपयेप्रमाणे अदा केले असून, जून महिन्यात १५० रुपये टनप्रमाणे दुसरा हप्ता दिला. यामध्ये कार्यक्षेत्र व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सर्व उत्पादकांना समान दर दिला. तिसरा व अंतिम हप्ता १५० रुपये टनाप्रमाणे देऊन दसऱ्यानंतर ही रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा केली जाईल. याशिवाय ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या उसास १०० रुपयेप्रमाणे अनुदान, असे एकूण रुपये ३ हजार २०० रुपये दर देणारा काळे कारखाना एकमेव आहे.
सन २०२४-२५ मध्ये कारखान्यास निव्वळ नफा ३.७८ कोटी रुपये झाला. लेखापरीक्षकांनी ऑडिट वर्ग अ दिला आहे. केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्रीदर ३ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहीर केला होता. सहा वर्षाचा कालावधी होऊनही साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही, तर एकीकडे उसाच्या एफआरपीमध्ये वाढ होताना साखरेच्या किमतीत मात्र वाढ केली जात नाही. साखर उद्योगामध्ये अनिश्चितता असल्याने अशा प्रकारच्या दरवाढी या स्वयंचलित झाल्या पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विक्रमी ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना आगामी दोन वर्षांसाठी आहे.
विरोधकांचा गैरसमज दूर करू
विकासकामांच्या जोरावर व जनतेच्या पाठिंब्यावर विधानसभा निवडणुकीत निवडून आलो. मात्र, विधानसभा निवडणुकीबाबत काही लोक उपकाराची भाषा बोलायला लागले आहेत. त्यांना कार्यकर्त्यांना ‘चार्जिंग’ ठेवावे लागत आहे हे समजू शकतो. मात्र, वारंवार अशी वक्तव्ये आल्यास बाजार समिती, शिक्षक मतदारसंघ किंवा लोकसभेच्या निवडणुकींचे विश्लेषण करून त्यांचा तो गोड गैरसमज दूर करण्यास मी भक्कम आहे, असा टोला आमदार काळे यांनी पारंपरिक विरोधक कोल्हे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.