….म्हणून ‘मराठी अभिमान गीता’मध्ये शेवटच्या चार ओळी वगळल्या

कौशल इनामदार यांनी दिले स्पष्टीकरण

kaushal inamdar
मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिनानिमित्त विधीमंडळाच्या आवारात कौशल इनामदार यांच्या संगीतसंयोजन, मार्गदर्शनात मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील बऱ्याच प्रसिद्ध चेहऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मोठ्या अभिमानाने मराठी राजकीय नेतेमंडळी मराठी अभिमान गीत सादर करतेवेळी अचानक माईक बंद पडल्यामुळे त्या ठीकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. त्याशिवाय या गीतगायनादरम्यान शेवटचे कडवे वगळले गेल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर करत विधानसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ केला. या सर्व प्रकरणावर एकिकडे वाद रंगत असतानाच गायक, संगीतकार कौशल इनामदार यांनी हे अभिमान गीत प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्याच वर्षी त्या चार ओळी वगळल्या गेल्याबद्दल आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केले होते. त्या ओळी वगळल्या गेल्याबद्दल त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपली बाजू त्यांनी या ब्लॉगमधून मांडली होती.

२०१३ मध्ये कौशल इनामदार यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते….
यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्युबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले.
त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या? त्या ओळी खालीलप्रमाणे आहेत.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकरता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. मूळ कविता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान कविवर्य सुरेश भट यांनी लिहिली होती. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात ही कविता प्रथम छापून आली होती. तेव्हा या चार ओळी लिहिल्याच गेल्या नव्हत्या. त्यामुळे इथे पहिला ठळक मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की मूळ कवितेमध्ये या ओळी नव्हत्या! पुढे १९८०च्या दशकात सुरेश भटांच्या एका कार्यक्रमात (ज्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते) या चार ओळी भटांनी म्हटल्या. आज आपल्याला सुरेश भटांच्या आवाजात ज्या ओळी ऐकू येतात त्या याच कार्यक्रमातल्या आहेत असा माझा अंदाज आहे. म्हणजे मूळ कवितेनंतर साधारण २० वर्षांनी या ओळी सुरेश भटांनी लिहिल्या! पण त्यानंतरच्या ‘रूपगंधे’च्या कुठल्याही, अगदी, शेवटच्या आवृत्तीतसुद्धा या ओळी आपल्याला आढळत नाहीत. याचं कारण काय असावं? खुद्द सुरेश भटांनीसुद्धा या ओळी छापील स्वरूपात जनतेसमोर का येऊ दिल्या नाहीत?

मराठी भाषा दिन : लाभले आम्हास भाग्य…

मला असं वाटतं की ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ ते ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ (म्हणजे जी मूळ कविता आहे) ती अत्यंत चिरंतन आहे. पण ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ ही परिस्थिती काही चिरंतन नाही आणि ती तशी असावी असं आपल्याला खचितच वाटत नाही! ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ हे आज जरी सत्य असलं तरी ते सत्य चिरकाल टिकणारं नाही आणि ते आपण तसं राहू देता कामा नये. ही परिस्थिती आज न उद्या बदलेल, पण ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ हे सत्य चिरंतन आहे अशी माझ्या मनाची धारणा आहे. मराठी अभिमानगीत हे मराठीचे ‘अॅन्थम’ (स्फूर्तिगीत या अर्थी) आहे आणि कुठल्याही ‘अॅन्थम’मध्ये क्षणिक सत्याला वाव नाही. उदाहराणार्थ, ‘जन गण मन’ किंवा ‘वंदे मातरम’ मध्ये ‘भारत किती गरीब देश आहे आणि भ्रष्टाचार कसा विळखा घालून भारतवासीयांच्या मानगुटीवर बसलाय’ असं आपण म्हणू का?

मराठी ‘अभिमान’गीत म्हणायचं आणि मग ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ असंही म्हणायचं हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी फक्त मूळ कवितेचंच ध्वनिमुद्रण केलं. ‘रूपगंधा’ची नवीन आवृत्ती काढून पाहिलीत तरी तुम्हाला या चार ओळी दिसणार नाहीत की इयत्ता सहावीच्या पुस्तकात या ओळी आपल्याला आढळणार नाहीत. खुद्द कविवर्य सुरेश भटांनाही या ओळींमध्ये दर्शवल्या गेल्या क्षणिक परिस्थितीची कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी त्या ओळी म्हटल्या पण कधीही छापू दिल्या नाहीत! याच कारणासाठी मी या चार ओळींना चाल दिली. काही कार्यक्रमांतून मी या चार ओळी म्हणतो देखील पण त्या ओळी ध्वनिमुद्रित केल्या नाहीत. मराठी भाषा चिरकाल राहणार आहे पण मराठीवर आलेली बिकट परिस्थिती ही आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी क्षणिक आणि तात्कालिकच राहील – या माझ्या विश्वासातून हा निर्णय घेतला गेला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kaushal inamdar clarifies why last four lines were not included during marathi abhiman geet performance in maharashtra assembly

ताज्या बातम्या