कविता महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुक पोस्टमधून प्रकाशकांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. प्रकाशक कसे चुकीच्या पद्धतीने वागतात. पायाभूत संकेतही कसे सोयीस्करपणे विसरतात याबाबत त्यांनी परखड शब्दात भाष्य केले होते. प्रकाशकांना लेखकांच्या कष्टांची जाणीव नसते. त्यामुळे पुस्तके कोणाकडे छापायला देण्यापेक्षा ती इंटरनेटवर प्रसिद्ध करावीत असे वाटते असे त्यांनी म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटले होते फेसबुक पोस्टमध्ये
आपल्याकडे प्रकाशकांना किमान प्रोटोकॉल पाळता येत नाहीत. तोंडी दिलेले शब्द पाळले जात नाहीत, म्हणून लेखी कागदपत्रं करावीत, तरी तेही काहीजण सोयीस्कर विसरतात. ( एका प्रकाशकाकडे दहा पुस्तकांचा संच चार वर्षं पेंडिंग आहे. दुसऱ्याकडे दोन पुस्तकं आणि अजून दोघांकडे एकेक पुस्तक पेंडिंग आहे. काही गणितंच कळत नाहीत यांची. स्पष्ट सांगावं, तर तेही यांना जमत नाही. )

मी लिहिते ते माझी बौद्धिक-मानसिक गरज म्हणून; संपादनं वगैरे करते ते निव्वळ वाड्मयीन खाज म्हणून. यात वेळ, पैसा, तासन् तास बैठक मारून लिहीत बसण्याचे शारीरिक कष्ट, बाकी सगळे वैयक्तिक प्राधान्यक्रम बाजूला सारून लिहिणं सगळ्या कामांच्या डोक्यावर आणून ठेवणं… किती गुंतवणुकी असतात… आणि या लोकांना लेखकाच्या कष्टांची, गुंतवणुकीची जाणीवच नसते की तुमची पुस्तकं छापतो आहोत म्हणजे उपकार करतोय असा भाव असतो?

या सगळ्या गोष्टी हळूहळू तडजोडी कराव्या वाटण्याच्या पलीकडे चालल्या आहेत. यापुढे कुणाही प्रकाशकांकडे पुस्तकं छापायला देण्यापेक्षा थेट नेटवर आपली आपण प्रकाशित करावीत असं वाटतंय. कारण लिहिण्याची इतकी सवय झाली की, न लिहिता तर जगता येणार नाही आता.

आणि कामच करायचंय तर शांतपणे एखादं पाळणाघर चालवावं. अगदी छोट्या बाळांना देखील मी उत्तम सांभाळू शकते. कोऱ्या पुस्तकाच्या वासाहून बाळाच्या कोवळ्या जावळाचा वास जास्त जिवंत असतो. आपल्या देशात या कामांना नीट प्रशिक्षण दिलं जात नाही आणि प्रतिष्ठा तर मुळीच नसते, हे मुद्दे खड्ड्यात जाऊ देत. तिथं चार नोकरदार आया माझ्यामुळे निश्चिंत कामावर जातील, हे पुरे. हे केवळ उबग आणणारं वा अपमानास्पद नव्हे, लाजीरवाणं देखील आहे… याची जाणीव आपल्या प्रकाशकांना कधी होईल?

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavita mahajan slamed publisher from her facebook post
First published on: 27-09-2018 at 22:52 IST