Khalid ka Shivaji Marathi Movie Controversy Rohit Pawar : ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. या मराठी चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील म्हटलं आहे की आम्ही शिवप्रेमींच्या बाजूने आहोत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) जरी या चित्रपटाला प्रमाणित केलं असलं तरी त्यांनी या गोष्टीचा फेरविचार करावा. यासंदर्भात शेलार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या सचिवांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’ची स्तुती करणारे मंत्री शेलार अचानक आता कारवाई का करत आहेत? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर सरकारमधील काही लोक शेलार यांना टार्गेट करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हे दुर्दैवी आहे : रोहित पवार

रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आशिष शेलारजी आपण ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची पत्रकार परिषदेत स्तुती केली व आपल्या विभागाने सर्व गोष्टी तपासून हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवून या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिलं त्याबद्दल आपलं अभिनंदन! सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून आपलं काम चोख आहे, मात्र आता केवळ काही ठराविक संघटना याला विरोध करत आहेत म्हणून उद्या चित्रपट प्रदर्शित होत असताना सरकार आज दिग्दर्शकाला नोटीस पाठवतं, हे दुर्दैवी आहे.

“सरकारच्या नोटीशीवरून आशिष शेलार यांना सरकारमधील काही लोकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न पडतो. एखाद्या चित्रपटावर अनेकांचं भविष्य अवलंबून असतं, त्यामुळे आपण या दबावाला बळी न पडता या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाल व लवकरात लवकर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल ही अपेक्षा!”

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

आशिष शेलार म्हणाले, चित्रपटामुळे कोणाच्याही भावना दुखावणं किंवा चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ‘सीबीएफसी’ने त्याचा फेरविचार करावा. हा चित्रपट मध्यंतरी चित्रपट महोत्सवासाठी पाठवण्याची भूमिका ज्या निवड समितीने घेतली, त्या संदर्भातील चौकशीचे आदेश मी दिले आहेत. त्यांनी योग्य अभ्यास केला होता का? चित्रपट पाहिला होता का? कथा वाचली होती का? चित्रपटात खोडसाळपणा होता का? या गोष्टींची चौकशी प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयालाने करावी.