scorecardresearch

“माझ्या ९० वर्षांच्या आईनं उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की..”, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड!

किरीट सोमय्या म्हणतात, “उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारला मी आव्हान देतोय. तुम्ही माझी १३ तास काय, १३ दिवस चौकशी करा…”

kirit somaiya on uddhav thackeray
किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका!

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपांचं जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्यांनी सातत्याने राज्य सरकारमधील वेगवेगळ्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली ५७ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात सध्या किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असताना आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“उद्धट सरकारला आव्हान देतो की…”

आज किरीट सोमय्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. “उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारला मी आव्हान देतोय. तुम्ही माझी १३ तास काय, १३ दिवस चौकशी करा. उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांच्या घोटाळ्याचं तेरावं किरीट सोमय्या करूनच थांबणार”, असं सोमय्या म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे, तुम्ही माझ्या आईला विसरला”

दरम्यान, सुरू असलेल्या चौकशीच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “नील सोमय्याही चौकशीला हजर होणार. कोर्टानं नीललाही संरक्षण दिलंय की या खोट्या एफआयआर आहेत म्हणून. तुमचे नेते संजय राऊत म्हणतात की आता मेधा सोमय्या यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल होणार. उद्धव ठाकरे, तुम्ही माझ्या आईला विसरलेला दिसताय. ९० वर्षांच्या माझ्या आईने सांगितलंय की उद्धव ठाकरेंना निरोप द्या की माझ्याविरुद्धही गुन्हा दाखल करा. सगळे सोमय्या चौकशीला सामोरे जायला तयार आहेत”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

“माझं आव्हान आहे, डरपोक संजय राऊतांनी…”, किरीट सोमय्यांचा निशाणा; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईचा केला उल्लेख!

“एवढा उद्धटपणा कधी पाहिला नाही”

“उद्धव ठाकरे, त्यांचा परिवार आणि सरकार फक्त घोटाळे करून लोकांचे पैसे आणि रक्त शोषतायत. त्यांना वाटतंय देशात कुणी देशभक्त नागरीक नाहीये? सोमय्या परिवार महाराष्ट्राच्या सेवेत हजर आहे. एवढा उद्धटपणा महाराष्ट्राची जनता पहिल्यांदा पाहात आहे. आहे काय? ५७ कोटी? ७५०० कोटी? कळेल ना आता. उद्धटपणा थांबवा उद्धव ठाकरे सरकार. माफियांचं महाराष्ट्रात फार काळ चालणार नाही”, अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

संजय राऊतांनाही आव्हान

दरम्यान, यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील आव्हान दिलं आहे. “संजय राऊत, तुमच्यात हिंमत होती, तर ५७ कोटींची एफआयआर का नाही केली? ७५०० कोटी अमित शाह यांना दिले, याची एफआयआर का नाही केली? नील सोमय्याच्या बोगस कंपनीवर का एफआयआर केली नाही? डरपोक संजय राऊत, माफिया सरकारचा उपोग करून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दाबू शकणार का? मी संजय राऊतांना चॅलेंज करतो. डरपोक संजय राऊतांनी १२ आरोप माझ्यावर केलेत, १२ एफआयआर दाखल कराव्यात”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somaiya slams cm uddhav thackeray sanjay raut save ins vikrant fraud case inquiry pmw

ताज्या बातम्या