|| रसिका मुळ्ये, लोकसत्ता
मुंबई : तीन पिढय़ांपासून सकस मजकुरातून वाचनानंद देणाऱ्या ‘किशोर’ मासिकाने पन्नाशीत पदार्पण केले आहे. ऐंशीच्या दशकात दूरचित्रवाणीत रमलेल्या, नंतर संगणक युगात दंग झालेल्या आणि आता तळहातावर मोबाइल खेळवणाऱ्या पिढीला वाचनगोडी लावण्यात किशोरचा मोठा वाटा आहे.
मुलांसाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या नियतकालिकांचा अस्तित्व टिकवून ठेवण्याचा संघर्ष सुरू असताना ‘किशोर’चे गारुड आजही आहे. बालभारतीने १९७१मध्ये बालदिनाचे (१४ नोव्हेंबर) औचित्य साधून पहिला अंक प्रकाशित केला होता. त्याला यंदा ५० वर्षे होत आहेत.
‘किशोर’च्या पहिल्या अंकाचे कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकर होते. पहिला अंक सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आला होता. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आजमावून जानेवारी १९७२पासून नियमित अंक प्रकाशित करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दहा हजार प्रती छापण्यात आल्या. मात्र, सहा महिन्यांतच प्रतिसाद वाढत गेला. सध्या ७० हजारांपेक्षा अधिक प्रतींचे वितरण करण्यात येते.
सकस मजकूर
कथा, कविता, कोडी, विज्ञान, तंत्रज्ञान यांवर आधारित सदरे, लेख हे सर्व साहित्य मुलांना समजेल अशा भाषेत ‘किशोर’ने प्रसिद्ध केले. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, शांता शेळके, नरहर कुरुंदकर, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांसारख्या अनेक दिग्गजांच्या साहित्यकृतींनी ‘किशोर’चे संग्रहमूल्य आजही टिकून आहे.
विशेषांकांची परंपरा
दरवर्षीच्या दिवाळी विशेषांकाबरोबरच उन्हाळी सुट्टी विशेषांक ‘किशोर’ने प्रसिद्ध केले. त्याशिवाय प्रासंगिक विशेषांक प्रसिद्ध करणे ही ‘किशोर’ची परंपरा आहे. नाटय़, लोककथा, स्वातंत्र्य, कारगिल युद्ध, स्वच्छता अशा अनेक विषय आणि आशयांवरील अंक प्रसिद्ध झाले आहेत.
वैशिष्टय़पूर्ण मुखपृष्ठ
‘किशोर’च्या पहिल्या अंकापासून मुखपृष्ठ आणि आतील चित्रे हे त्याचे वैशिष्टय़ आहे. प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी किशोरच्या पहिल्या अंकाचे चित्र रेखाटले होते. त्यानंतर राम वाईरकर, प्रभाशंकर कवडी, पद्म सहस्रबुद्धे, श्रीधर फडणीस, मारिओ मिरांडा, अनंत सालकर, रवी परांजपे, शांताराम पवार, अनंत कुलकर्णी, श्याम फडके, मुकुंद तळवलकर, अरुण कालवणकर, भालचंद्र मोहनकर, रेश्मा बर्वे, घनश्याम देशमुख, प्रभाकर काटे, रमेश मुधोळकर अशा अनेक दिग्गजांच्या चित्रांनी ‘किशोर’चे अंक सजले. नामवंत कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनाही ‘किशोर’ने व्यासपीठ मिळवून दिले.
कालानुरूप बदल
कालानुरूप बदल केल्याने बालक आणि पालकांच्याही मनात ‘किशोर’ने स्थान टिकवून ठेवले आहे. मुलांमधील लेखकांच्या शोधत ‘किशोर’ने लेखन कार्यशाळा घेतल्या. अलीकडच्या काळात गरजेनुसार मराठीबरोबरच इंग्रजीतील गोष्टी, कविता, कोडी यांचाही समावेश अंकात करण्यात आला. पहिल्या अंकापासून सर्व अंकाचे ‘बुकगंगा डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या सहकार्याने ऑनलाइन दस्तावेजीकरण करून दोन वर्षांपूर्वी ते सर्वासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. टाळेबंदीच्या काळात जवळपास १० लाख वाचकांनी किशोरचे अंक डाऊनलोड केले आहेत.