कायद्याच्या अडचणी निर्माण करून सर्व बाजूंनी उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना पक्षालाच संपवून टाकण्याचा विडा शिंदे गट आणि भाजपाने उचलला आहे. राजकारणाचा सुसंस्कृतपणा संपत चालला आहे, अशी टीका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
अंधेरी-पूर्वच्या शिवसेना उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई पालिकेने अद्यापही मंजूर केला नाही. त्या पार्श्वभूमीवर किशोर पेडणेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “काही कारणास्तव तुम्ही काम सोडणार असाल, तर पैसे भरून राजीनामा देऊ शकता. ऋतुजा लटकेंनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांची महापालिकेतील वर्तणूकही चांगली होती. मात्र, एखाद्या लिपीकासाठी शिंदे गट इतका अट्टहास का करत आहे?,” असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला आहे.
हेही वाचा – विश्वनाथ महाडेश्वरच ऋतुजा लटकेंचा घात करणार?, मनसेचा खळबळजनक आरोप
“शिवाजी पार्कवेळेही महापालिकेने अरेरावी केली. पण, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पालिकेला तोंडावर पडण्याची वेळ आली. काही अधिकाऱ्यांमुळे पालिकेच्या १५० वर्षाचा इतिहास पुसला जात आहे. लटकेंच्या जागी अन्य उमेदवार दिल्यास त्याला पराभूत करण्याचा काहींना साक्षात्कार होतोय,” असा टोला पेडणेकरांनी भाजपाला लगावला आहे.
