धुळ्यातील ‘खुनी गणपती’ची विसर्जन मिरवणूक सर्वांनी आदर्श घ्यावा अशी आहे. खुनी गणपती हा धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. १८९५ साली खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. एका वर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात होती. त्यावेळी गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला, काही वेळातचं या भांडणाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. यावेळी उपस्थिती ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला, ज्यामध्ये बरेच लोक मृत्यूमुखी पडले. यावेळी धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या वेळी मशिदीच्या परिसरात खून होतात अशी समजूत रुढ झाली…या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचं ‘खुनी गणपती’ हे नाव पडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर तत्कालिन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला. दोन्ही गटांमध्ये एकोपा रहावा यासाठी २२८ रुपये देण्यास सुरुवात झाली. त्यावर्षापासून आजपर्यंत धुळ्यातील ‘खुनी गणपती’ हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक बनलेला आहे. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. संध्याकाळी ५ वाजता म्हणजेच नमाजाची अजान होत असताना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दारासमोर येते. यावेळी रिवाजाप्रमाणे मशिदीमधून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीत उपस्थित असलेल्या ज्येष्ठ धार्मिक अधिकाऱ्याकडून गपणतीला गुलाबांच्या फुलाचा हार घालून आरती झाल्यानंतर गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. धुळ्यातील अनेक स्थानिक लोकांच्या मतानुसार मशिदीसमोर आल्यानंतर गणपतीची मुर्ती जड होते.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the tradition of khuni ganpati in dhule city of maharashtra sas
First published on: 11-09-2019 at 15:38 IST