हिंदुत्त्ववादी संघटनांकडून महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृह पाडण्याचा प्रयत्न

पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृह सोमवारी हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांकडून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंदिराच्या आवारातील पौराणिक मणिकर्णिका कुंड बंद करून तेथे हे स्वच्छतागृह उभारण्यात आल्याचा दावा हिंदुत्त्ववादी संघटनांकडून करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी हातोडा, कुदळ घेऊन काही कार्यकर्त्यांनी या स्वच्छतागृहाचे बांधकाम पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृह पाडून तिथे पुन्हा मणिकर्णिका कुंड सुरू करावे, असे आदेश तीन वर्षांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, असा दावा आंदोलकांनी केला आहे. मंदिर समितीने स्वच्छतागृह बंद न केल्यामुळेच ते पाडण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे हिंदुत्त्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. या आंदोलनानंतर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा घटनास्थळी आले होते. त्यांनी सुद्धा मणिकर्णिका कुंड सुरू करण्याची मागणी केली आहे. या प्रकारानंतर मंदिराच्या आवारातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kolhapur mahalakshmi mandir issue