कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या १० पैकी सहा सदस्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलले आहे. तर पक्षातील दुफळीनंतर शिवसेनेतील स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना सहभागी होणार नाही असे जाहीर करावे लागले.

कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या ६७ जागा असून यामध्ये भाजपला १४, काँग्रेसला १४, राष्ट्रवादीला ११ आणि शिवसेनेला १० जागा मिळाल्या आहेत. अध्यक्षपद मिळवण्यासाठी ३४ जागांची आवश्यकता आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपची सत्ता येणार असा दावा नेते करत होते. मात्र सोमवारी शिवसेनेने भाजपऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असे जाहीर करत भाजपला धक्का दिला होता. भाजपकडून त्रास झाल्याने सोबत न जाण्याचा निर्णय घेतला असे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी म्हटले होते.

अवघ्या २४ तासांमध्ये शिवसेनेत फूट पडली. मंगळवारी सकाळी शिवसेनेचे ३ आमदार त्यांचे सहा सदस्य घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर सहा सदस्यांनी भाजपला पाठिंबा देऊ असे जाहीर केले. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेला अध्यक्षपदाची ऑफरही दिली होती मात्र काँग्रेसचे संख्याबळ जमत नव्हते. तर काँग्रेसला पाठिंबा देण्यावर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती.

शिवसेनेच्या सहा सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तसेच जनसुराज्य आणि ताराराणी या पक्षाच्या सदस्यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ आता ३६ वर पोहोचले होते. भाजपकडून आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे अध्यक्षपदासाठी उभे होते. दुपारी झालेल्या निवडणुकीत शौमिका महाडिक या विजयी झाल्यात. पाठिंब्याच्या मोबदल्यात भाजपने शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. शिवसेनेचे सर्जेराव पाटील हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.

कोल्हापूरमधील शिवसेनेतील फूटही या निमित्ताने समोर आली आहे. सोमवारीदेखील संजय मंडलिक यांच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तिन्ही आमदार अनुपस्थित होते. शिवसेनेच्या १० पैकी सात सदस्य या आमदारांच्या गटातील आहेत. मातोश्रीवरून आदेश आले असतानाही या तीन आमदारांनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.