बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही कोकण माध्यमिक शिक्षण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मंडळाचा निकाल ९३.७९ टक्के लागला असून त्याखालोखाल कोल्हापूर (९०.३६) आणि मुंबईचा (८८.९२) क्रमांक राहिला आहे.
कोकण मंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून मिळून एकूण ४१ हजार ६७८ विद्यार्थी परीक्षेला बसले व त्यापैकी ३९ हजार ८९ उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हे प्रमाण ९३.७९ टक्के आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा निकाल ९५.३९ टक्के तर रत्नागिरीचा निकाल ९२.९९ टक्के लागला आहे. रत्नागिरीमध्ये ३८५ माध्यमिक शाळांसाठी ६३ परीक्षा केंद्रे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात २१६ शाळांसाठी ३८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
मंडळाच्या अखत्यारीतील १७३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डी. एस. जगताप यांनी जाहीर केले. कोकण मंडळातर्फे गेल्या वर्षांपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणे सुरू झाले आहे. त्यापूर्वी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळामार्फत या परीक्षा घेतल्या जात असत. पण प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्टय़ा ते गैरसोयीचे असल्यामुळे कोकणातील दोन जिल्ह्य़ांसाठी स्वतंत्र विभागीय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गेल्या वर्षी आणि यंदा घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये या जिल्ह्य़ांमधील विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश मिळवत राज्य पातळीवर अव्वल स्थान पटकावले आहे.
मंडळातर्फे संकेतस्थळावर आज हा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके येत्या १५ जून रोजी संबंधित शाळांमध्ये वितरित केली जाणार आहेत.