आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकांत चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील आता रस्त्यावर उतरले असून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कोकण जागर यात्रेच्या माध्यमातून रायगडमधील कोलाड येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी कोकणातील लोकांना जमिनी न विकण्याचे आवाहन केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली. मीदेखील याचं रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, असे राज ठाकरे म्हणाले.
“व्यापाऱ्यांच्या घशात जमिनी घालू नका”
“कमी किमतीत जमिनी खरेदी केल्या जात आहेत. नंतर या जमिनी मोठ्या व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांना विकल्या जात आहेत. जेव्हा दळणवळणाच्या सुविधा होतात, तेव्हा त्या जमिनीचा भाव खूप वाढतो. हे गणित एकदा समजून घ्या. ज्या जमिनी तुमच्या आहेत, त्या तशाच ठेवा. या भागात जेव्हा रस्ता होईल, तेव्हा या जागांना खूप भाव असेल. रस्ता झाल्यानंतर त्या जागेतून तुम्हाला जास्त पैसे मिळतील. तुमच्या पुढच्या पिढ्यांना या जमिनीतून जास्त पैसा मिळेल. व्यापाऱ्यांच्या घशात जमिनी घालू नका. या व्यापाऱ्यांना काय रट्टे लावायचे ते आम्ही लावू,” असे आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासीयांना केले.
“…त्याच पद्धतीचं रिटर्न गिफ्ट देऊ शकतो”
“परवा माझ्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. माझ्या पदाधिकाऱ्यांना सरकारने पोलीस ठाण्यात अंतरवस्त्रांवर बसवले होते. सरकार आजचे असो की कालचे, मला त्यांना फक्त हेच सांगायचे आहे की, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. माझ्या कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने कारवाई केली, त्याच पद्धतीचं रिटर्न गिफ्ट मीदेखील देऊ शकतो,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
“सगळेच पेपर आज फोडायचे नसतात”
हाच मुद्दा घेऊन पुढे राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर खरपूस शब्दांत टीका केली. “विचार करा की ते दिसतील कसे. कारण यांच्या अंगावरचे खड्डे पाहण्यापेक्षा रस्त्यावरचे खड्डे पाहिलेले बरे. माझी कोकणातील लोकांना सांगू इच्छितो की असेच जागरूक राहा. पुढे काय करायचे ते लवकरच कळवतो. सगळेच पेपर आज फोडायचे नसतात,” असे म्हणत राज ठाकरे यांनी मनसेची कोकणासंदर्भातील रणनीती लवकरच ठरवली जाईल, असे अप्रत्यक्षपणे सांगितले.