सावंतवाडी : वैभववाडी कोकण रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा मिळावा, आरक्षण खिडकी पुन्हा सुरू करावी आणि इतर प्राथमिक सोयीसुविधा पुरवाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, वैभववाडीने रेल्वे प्रशासनाला ‘रेल रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नुकतीच कोकण रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर आणि चिन्मय भंडारी यांनी वैभववाडी स्टेशनला भेट देऊन येथील समस्यांची पाहणी केली. या भेटीदरम्यान, प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्टेशनवरील समस्यांचा पाढाच वाचला. वैभववाडी हे वैभववाडी तालुक्यासह देवगड, कणकवली आणि गगनबावडा तालुक्यातील काही गावांना सोयीचे स्टेशन असल्यामुळे येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या येथे केवळ चारच गाड्या थांबत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
जलद गाड्यांना थांबा: वैभववाडी हे महत्त्वाचे स्टेशन असूनही त्याला दुजाभाव दिला जात आहे. त्यामुळे येथे जलद एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा.तसेच आधीप्रमाणे आरक्षण खिडकी पुन्हा सुरू करावी. सध्या प्रवाशांना तिकिटासाठी कणकवलीला जावे लागते, ज्यामुळे आर्थिक आणि वेळेचा अपव्यय होतो. तुतारी एक्सप्रेसमध्ये डब्यात वाढ झाली पाहिजे.सध्या १६ डब्यांची असलेली तुतारी एक्सप्रेस २४ डब्यांची करावी.स्टेशनकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा, निवारा शेड बांधावी आणि सर्व गणपती स्पेशल गाड्यांना येथे थांबा द्यावा.
या मागण्या मान्य न झाल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण आता आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या भेटीदरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर जैतापकर, वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.