संगमनेर : संगमनेर शहरातील श्रीरामनगर भागात आठ जणांच्या टोळक्याने हप्त्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून एका कार दुरुस्ती व्यावसायिकाला धमकावत लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर याच टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही ओरबाडून नेले.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आठ जणांच्या टोळक्यातील मुख्य आरोपी धीरज राजेंद्र पावडे (वय २३), संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २४) आणि दीपक सोमनाथ वैराळ (वय २३) या तिघांना पोलिसांनी लगोलग अटक केली आहे. आज, गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य पाच आरोपी अद्यापही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील श्रीरामनगर येथील व्यावसायिक शहाणे हे त्यांचे व्यवस्थापक बाळासाहेब भुजबळ यांच्यासोबत दुकानात बसले होते. त्याच वेळी सात-आठ तरुणांचे टोळके त्यांच्या दुकानात आले. त्यांच्यापैकी एकाच्या हातात कोयता होता. टोळक्याने शहाणे आणि भुजबळ यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
यातील धीरज पावडे याने कोयत्याचा धाक दाखवून आम्हाला हप्ता (खंडणी) चालू करायचा, नाहीतर दुकान जाळून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन आरोपींनी व्यवस्थापकाच्या काउंटरमधून १० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढली. पावडेने शहाणे यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीची अडीच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतली.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही लुटले
याच टोळक्याने जवळच उभ्या असलेल्या भाग्यश्री दिलीप गायकवाड यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रही हिसकावून नेले. या दोन्ही घटनांबाबत शहाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहकरे, दीपक वैराळ, संदीप वाल्हेकर उर्फ जब्या, निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर यांच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे लोक आता बोलू लागले आहेत. आता तर थेट पुण्याप्रमाणे कोयत्याचा वापर करून लुटीची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यांवर वेळीच कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.