चंद्रपूर : येथील ज्येष्ठ नागरिक ८४ वर्षीय कृष्णाजी नागपुरे यांनी चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण केंद्रात जागतिक योग दिनी जलतरण कौशल्याचे योग प्रात्यक्षिके दाखवली. योग दिनी योगाच्या सुमारे २० प्रकारांचे स्थिर जलतरण प्रात्याक्षिके त्यांनी सादर केलीत. त्यामध्ये हातपाय पसरून निपचित उताणे पडून राहणे, पाण्यात काटकोन स्थितीत दंडापासून हात उंचावणे, पाय व हात नमस्कार स्थितीत ठेवणे, खाटेवर झोपल्याप्रमाणे हात उशाला घेऊन पाण्यात पडून राहणे, पद्मासन स्थितीत हात मांडीवर ठेवून पाण्याशी समांतर व काटकोन स्थितीत राहणे, पाण्यात पाय सरळ ठेवून इंग्रजी ‘टी’ अवस्थेत स्थिर राहणे, तसेच सरळ पायांना हात मांडीशी लावून स्थिर राहण्याचे प्रयोग केले. याशिवाय उंदीर चाल, बदक चाल, खडी चाल, उताण्या स्थितीत चक्राकार पोहणे, पाण्यात हातांनी विशिष्ट आवाज काढणे, हातांचे पंजे पाण्यावर ठेवून फक्त पायांनी पोहणे, पलटी मारीत पोहणे, दोन्ही हात पाण्याबाहेर उंचावून पोहणे, पाय पाण्याशी समांतर ठेवून जागेवर माशाप्रमाणे पोहणे व पुढे जाणे, पाय पाण्यात समांतर सरळ ठेवून नौकेप्रमाणे फक्त हातांना पाणी वल्हवीत पुढे जाणे इत्यादी जलतरणाचे विविध प्रयोगही त्यांनी सादर केले. नागपुरे मूळ भद्रावतीचे. तेथील डोलारा तलावात १९५२ पासून त्यांनी जलतरणाचा सराव सुरू केला. चंद्रपुरात शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर १९५७ पासून रामाळा तलावात ते जलतरण करीत होते. मागील चार वर्षांपासून ते आपली कन्या इंजि. सुवर्णा व जावई प्रकाश कामडे यांच्या स्नेहनगरस्थित निवासस्थानी राहतात तेव्हापासून जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण केंद्रात ते जलतरण करीत असतात. कृष्णाजी नागपुरे यांना लहानपणापासून व्यायाम, क्रीडा व देशी खेळांची आवड आहे. जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे त्यांनी १९५६ ते १९५८ पर्यंत संपन्न-ग्रीष्मकालीन व्यायाम प्रवेश, व्यायामपटू व व्यायाम विशारद या शारीरिक अभ्यासक्रमात भाग घेतला. या तिन्ही वर्षी त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला होता.