कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं एक गाणं म्हटलं. त्यानंतर बराच वाद झाला. कुणाल कामरा याने ज्या ठिकाणी ते गाणं म्हटलं आणि शो केला त्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली. तसंच विधानसभेतही कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेचे प्रतिसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही. फ्रिडम ऑफ स्पीच असलं तरीही काहीही बोलता येणार नाही कारवाई होईल असं म्हटलं आहे. या सगळ्या वादानंतर आता कुणाल कामराने चार पानी स्टेटमेंट पोस्ट केलं आहे.

नेमकं काय घडलं?

कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून त्यानं गाणी म्हणून दाखवली. यावरून आता मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. एकीकडे तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल कामराची पोस्ट काय?

My Statement असं म्हणत त्याने चार पानी पोस्ट लिहिली आहे. पहिल्या पानावर कुणाल कामरा म्हणतो, “ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या शोचीच जागा आहे. हॅबिटट हे ठिकाण, तो स्टुडिओ जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही. या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या ठिकाणी अपशब्दही वापरले गेले. आम्ही जे बोललो त्यामुळे लॉरी भरुन टॉमेटो मारण्याचा प्रयत्नही होईल कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही.” असं कुणाल कामराने त्याच्या मिश्किल अंदाजात पहिल्या पानावर म्हटलं आहे.

दुसऱ्या पानावर तो म्हणतो…

मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करु शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे.

तिसऱ्या चौथ्या पानावर काय म्हणतो कुणाल कामरा?

असो.. तरीही मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे. हॅबिटट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले? असे प्रश्न कुणाल कामराने विचारले आहेत.

मला असंख्य कॉल आले आहेत

माझा फोन नंबर लिक केला गेला आहे. त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत. आता मी ते व्हॉईस मेलवर फॉरवर्ड केले आहेत. मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात ना त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा क्रमांक १५९ वा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची माफी मागणार नाही

मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कुणालाही घाबर नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.