धुळ्यात १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय आणि १०० खाटांचे सार्वजनिक रुग्णालयासह कुसुंबा येथे ट्रामा सेंटर, लामकाणीत ग्रामीण रुग्णालय, तालुक्यात तीन आरोग्य उपकेंद्रे आणि आरोग्य विभागात ६४ नवीन पदे मंजूर झाल्याची माहिती धुळे ग्रामीणचे आ. प्रा. शरद पाटील यांनी दिली आहे. या प्रश्नांचा गेल्या तीन वर्षांपासून आ. प्रा. पाटील यांनी पाठपुरावा चालविला होता.
आरोग्य संस्था स्थापनेचा कृती आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांचा विचार करून शासनाने उपरोक्त निर्णय घेतले आहे. आ. प्रा. पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांपैकी बोरकुंड (रतनपुरा) ग्रामीण रुग्णालय वगळता ९० टक्के मागण्या कृती आराखडय़ात मान्य करण्यात आल्या आहेत. मंजूर आराखडय़ास शासनमान्यता मिळाल्याने येत्या पाच वर्षांत पदांची निर्मिती आणि खर्चाचे नियोजन टप्प्याटप्प्याने करावयाचे आहे. पुढील काळात बोरकुंड ग्रामीण रुग्णालय व भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ट्रामा सेंटर सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे आ. प्रा. पाटील यांनी म्हटले आहे
तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ यांचे विस्तारीकरण झाल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन ट्रामा सेंटरच्या निर्मिती व लामकाणी येथील ग्रामीण रुग्णालय आणि नवीन आरोग्य उपकेंद्रांची मागणी करण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी व आरोग्यसेविकांची संख्या कमी असल्याने जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयावर अतिरिक्त भार पडतो. परिणामी, रुग्णांची हेळसांड होते, अशी तक्रार आ. प्रा. पाटील यांनी वारंवार विधानसभेत केली होती. तसेच धुळे येथे नांदेड पॅटर्नप्रमाणे स्वतंत्र २०० खाटांचे रुग्णालय स्थापन करावे आणि सवरेपचार रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात हलविताना २०० खाटांचे रुग्णालय कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली होती. त्यासाठी शिवसेनातर्फे आंदोलनही करण्यात आले. बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे कुसुंबा येथे भव्यदिव्य असे ट्रामा सेंटर निर्माण होणार आहे. त्यामुळे धुळे, जळगाव, नवापूर भागातील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळू शकेल. तसेच लामकाणीसारख्या माळमाथा परिसरात ३० खाटांचे स्वतंत्र ग्रामीण रुग्णालय निर्माण होणार असल्याने परिसरातील २० ते २५ गावांना आरोग्य सेवेचा लाभ मिळू शकेल. नव्याने एकूण ५८ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे निर्माण झाल्याने उपकेंद्रावरील त्रास कमी होऊन रुग्णसेवेत सुधारणा होणार आहे. तसेच खेडे (आनंदखेडे), आर्बी, बोरकुंड, शिरूड, नगाव, मुकटी या सहा प्रा. आरोग्य केंद्रांत नव्याने सहा आरोग्यसेविकांच्या पदांना मंजुरी मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies and public hospital granted in dhule
First published on: 28-01-2013 at 02:53 IST