महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने घोषणा केली होती की जर आम्ही पुन्हा निवडून आलो तर हा निधी २१०० रुपये केला जाईल. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत काय सांगितलं?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार दोन कोटी रुपये खर्च झाला आहे. सन २०२५-२०६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. दादा, २१०० रुपये कधीपासून देणार असं विचारलं असता अजित पवार म्हणाले जरा थांबा असं म्हणत त्यांनी प्रश्नकर्त्यांना शांत केलं. तसंच आम्ही कुठल्याही घटकाला वंचित ठेवलेलं नाही असंही अजित पवार म्हणाले. बजेटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस?

लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत. कुठलीही योजना तयार होते तेव्हा एक गृहितक धरलं जातं, तीन कोटी, साडेतीन कोटी. त्या योजनेला अंतिम रुप येतं तेव्हा जर ते गृहितक २ कोटी ७० लाख झालं तर तेवढे पैसे वाचतात ना? योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर महिना आहे. आवश्यक तेवढी तरतूद आपण यामध्ये ठेवली आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून देणार याचंही उत्तर दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार?

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यासंदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे. एक लक्षात घ्या अर्थसंकल्पाचा समतोल राखणंही महत्त्वाचं आहे. घोषणा दिली आहे, तर ती पूर्ण करायची आहे. सध्या ट्रेंड्स खूप चांगले चालले आहेत. योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतुदीही करणं महत्वाचं असतं. समतोल राखत पुढे जायचं आहे, त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करणार. एप्रिल महिन्यात १५०० रुपयेच मिळणार. आम्ही २१०० रुपये कधी मिळणार ते घोषित करु. जेव्हा घोषित करु त्याच्या पुढच्या महिन्यांपासून २१०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल.” असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.