Ladki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणाकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी कोट्यवधि महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना आणखी दिलासा दिला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. एक्स पोस्टद्वारे त्यांनी ही बातमी दिली. राज्य सरकारचा जीआरच त्यांनी शेअर केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत होती. त्यानुसार अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले. तसंच, अर्ज स्वीकारण्याची गतीही या महिन्यात वाढवण्यात आली होती. त्यामुळे कोट्यवधि महिला ऑगस्ट महिन्यात पात्र ठरल्या आहेत. या महिन्यात पात्र ठरलेल्या काही महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांनी हे अर्ज भरलेले नाहीत. राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून राज्य सरकारने आता याचा कालावधी वाढवला आहे. आता ऑगस्ट महिन्यातही या योजनेसाठी नावनोंदणी करता येणार आहे. हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कुठे कराल अर्ज? पात्र कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती! याबाबत आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, "महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी." या पोस्टसहीत आदिती तटकरे यांनी राज्य सरकारचा जीआरही जोडला आहे. महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार.- ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.बदलाचे साक्षीदार नव्हे..… pic.twitter.com/t5TexKO4Vo— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 2, 2024 राज्य शासनाच्या सुधारीत शासन निर्णयात काय म्हटलंय? "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२४ मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील", असं या जीआरमध्ये नमूद आहे.