Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana July Installment: महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिना संपला तरी अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे, म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली आहे.
आदिती तटकरे यांनी काय म्हटलं?
“लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट!, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 1, 2025
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै…
२६.३४ लाख लाडक्या बहिणींचे पैसे येणे बंद होणार
महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजना आणली आणि महिलांनी योजनेला उचलून धरले. मासिक १५०० रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. १४,२९८ पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.
या पुरुषांना योजनेतून बाद करण्यात आले आहेच, शिवाय आता २६.३४ महिलाही योजनेत अपात्र ठरणार आहेत. खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली. आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.”