लातूर : उदगीर येथील नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळ पदाधिकारी आणि साहित्यप्रेमींची बैठक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत बोलताना राज्यमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली. आजवर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापेक्षा उदगीरचे साहित्य संमेलन आगळेवेगळे आणि ऐतिहासिक होण्यासाठी उदगीरकरानी झोकून देऊन काम करावे, असे आवाहनही बनसोडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांची तसेच जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांची जिल्हास्तरीय बैठक घेऊन साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही बनसोडे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरवत चाललेली वाचन संस्कृती नव्या पिढीमध्ये वाढावी यासाठी संमेलनाचे आयोजन केले असून ग्रंथ दिंडी, परिसंवाद, कविकट्टा, गझलमंच असे विविध कार्यक्रम होणार असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील-नागराळकर यांनी सांगितले. युवा साहित्यिक प्रतीक्षा लोहकरे हिनेही मनोगत व्यक्त केले. मराठवाडा साहित्य परिषदेचे उदगीर शाखेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरिवद लोखंडे, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, राजकुमार मस्के यांच्यासह अन्य पदाधिकारी, मान्यवर, साहित्यप्रेमी या बैठकीस उपस्थित होते.  प्रास्ताविक रामचंद्र तिरुके यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar name udgir literary convention town ysh
First published on: 24-02-2022 at 00:28 IST