ऊसदराच्या प्रश्नावर शासन जबाबदारी ढकलत असल्याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापुरात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.
जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जमाव कस्तुरबा भाजी मंडईजवळील िलगशेट्टी मंगल कार्यालयासमोर एकत्र आला. त्या ठिकाणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजिला होता. या मेळाव्यासाठी सहकारमंत्र्यांचे आगमन होताच शेतकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलक कार्यकर्त्यांना लाठीमार करून ताब्यात घेतले.
‘एफआरपी’नुसार उसाला दर देण्यास साखर कारखाने अद्यापही तयार नसताना दुसरीकडे अशा साखर कारखान्यांच्या विरोधात शासन केवळ कारवाई करण्याचा इशारा देते. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शासनाच्या विरोधात खदखद वाढत असल्यामुळे हीच भावना सहकारमंत्र्यांसमोर व्यक्त करण्यासाठी शेतकरी कार्यकत्रे एकत्र आले होते, परंतु सहकारमंत्र्यांनी आंदोलकांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. उलट त्यांच्या देखतच पोलिसांनी आंदोलकांवर लाठय़ा चालवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली. दरम्यान, पोलिसांनी देशमुख यांच्यासह १७ शेतकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2015 रोजी प्रकाशित
सोलापुरात सहकारमंत्र्यांची गाडी अडविल्याने लाठीमार
ऊसदराच्या प्रश्नावर शासन जबाबदारी ढकलत असल्याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापुरात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न केला.

First published on: 30-06-2015 at 12:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lathicharge on farmers at solapur