लातूरच्या निलंगा-औसा मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ निलंगा-औसा मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अपघातातील जखमींना लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कसा झाला अपघात?

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. निलंग्याच्या दत्तनगर भागातील व्यावसायिक सचिन बडूरकर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत पुण्याहून निलंग्याला निघाले होते. एका कारमध्ये ते लातूरच्या दिशेनं येत असताना निलंगा-औसा मार्गावरील उत्का पाटी या भागात त्यांची कार पलटली. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

हा अपघात इतका भीषण होता, की कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. यामध्ये सचिन बडुरकर यांची जोन मुलं अमर (१५) व जय (१०), सचिन बडुरकर यांचा पुतण्या अंश किरण बडुरकर (१०) आणि सचिन बडुरकर यांचा मेव्हणा प्रकाश लक्ष्मण कांबळे (२७) यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन जखमींवर उपचार

दरम्यान, अपघातामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यात स्वत: सचिन बडुरकर, त्यांच्या पत्नी आणि आणखीन एका व्यक्तीचा समावेश आहे. या तिघांवर लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.