लातूरच्या महापौरपदी काँग्रेसचे दीपक सूळ यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग पोले यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी महापालिका सभागृहात झालेल्या महापौरपद निवडणुकीत सूळ यांना ४५, राष्ट्रवादीच्या ईर्शाद तांबोळी १२, तर शिवसेनेचे गोरोबा गाडेकर यांना ६ मते पडली. काँग्रेसचे दोन नगरसेवक बाहेरगावी असल्यामुळे या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत.
महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे सूळ यांची निवड निश्चित होती. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सूळ म्हणाले की, माझी निवड काँग्रेस नेत्यांनी केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्या घरी भेट दिली म्हणून मला पद मिळाले हे साफ खोटे आहे. सूळ यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी महापालिकेचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. महापौरांच्या दालनात उपमहापौर कैलास कांबळे, गटनेते नरेंद्र अग्रवाल, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी महापौरांचे स्वागत केले.
महापौरांना अधिकारास उच्च न्यायालयाचा मज्जाव
महापौर अख्तर शेख यांनी उच्च न्यायालयात नव्या महापौरांच्या निवडणुकीसंबंधी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल ९ मे रोजीच जाहीर करण्यात आला. त्यात गुरुवारी होणाऱ्या महापौरांच्या निवडणुकीस न्यायालयाने मज्जाव केला नाही. मात्र, निवडून आलेल्या महापौरांना याचिकेच्या पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत (१३ जून) कोणतेही निर्णय घेण्याचा हक्क राहणार नाही, असा आदेश दिला आहे. त्याचबरोबर १३ जूनपर्यंत माजी महापौर अख्तर शेख यांच्या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. महिनाभर पालिकेचे कामकाज नेमके कसे चालणार? यासंबंधी आयुक्त सुधाकर तेलंग यांनी वकिलांशी सल्लामसलत करून भूमिका ठरवावी लागेल, असे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur mayor deepak sul
First published on: 13-05-2016 at 05:52 IST