लातूर – जयंतीवरून वाद का घातला, असे विचारत एका जमावाने शेतात काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा रविवारी मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील औंढा गावात घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दत्ता गायकवाड, अजय चवंडा, आदित्य मोरे व अन्य एक मिळून चौघांना अटक केल्याची माहिती कासार शिरसी पोलिसांनी दिली.

कासार शिरसी गावालगत असलेल्या औंढा गावात २५ एप्रिल रोजी जयंतीची मिरवणूक निघाली होती. या दरम्यान दोन गटांत वाद झाला. २६ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास गावातील दत्ता मारुती गायकवाड याने जयंतीवरून वाद का केला असे म्हणून दुसऱ्या गटातील लोकांसोबत हुज्जत घातली. त्यातून मारहाण सुरू झाली. बडूर गावचे शिक्षक गुरुलिंग अशोक हासुरे (वय ३८) हे शेतात काम करत होते. आरोपींनी हाही औंढा गावचाच आहे, असे समजून गुरुलिंग हासुरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला.चौकट

मृत गुरुलिंग हासुरे हे बडूर गावातील विद्यानिकेतन विद्यालय या खासगी शाळेत शिक्षक होते. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, हासुरे यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींपैकी सहा जण पसार असून, अटकेतील चौघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.