न्यायालयीन कोठडीत असलेले वकील तुळशीराम कोंडिबा बालवे यांचा जिल्हा कारागृहाच्या दारातच मृत्यू झाला. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. बालवे यांचा मृत्यू चक्कर येऊन खाली पडल्याने मार लागून झाल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे, तर हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत शहर वकील संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबतचा निर्णय उद्या, बुधवारी सकाळी होईल. मात्र या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी उद्या जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात येणार आहे.
न्यायालयाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून वकील बालवे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दि. २८ फेब्रुवारीला त्यांना अटक करण्यात आली. काही दिवस पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयाीन कोठडीत झाली. त्यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावर मंगळवारीच सुनावणी होती, परंतु यासंदर्भात काय आदेश झाला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
बालवे १० मार्चपासून न्यायालयीन कोठडीत होते. आज त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यासाठी नेले जाणार होते. त्यासाठी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मुख्यालयाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची नोंद केली. पोलीस शिपाई महेंद्र लोहकरे हे त्यांना कारागृहाच्या आतील दरवाजातून बाहेर आणले जात असतानाच ते खाली कोसळले. तेथे दगडी फरशा असल्याने त्यांच्या डाव्या भुवईजवळ जखम झाली. मोठा रक्तस्रावही सुरू झाला. ही घटना पाहणारे काही जण आहेत. कारागृहात त्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी तपासणी केली, इंजेक्शनही दिले. रुग्णवाहिका बोलावून अधिक उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून उपलब्ध झाली.
या घटनेची चर्चा दिवसभर जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकील गटागटाने करत होते. बालवे यांच्याविरुद्ध एकाच घटनेचे दोन गुन्हे दाखल केल्याबद्दलही वकिलांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. यासंदर्भात माहिती देताना वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. मंगेश सोले यांनी सांगितले, की बालवे यांच्या मृत्यूसंदर्भात परस्परविरोधी माहिती मिळत असल्याने मृत्यू संशयास्पद वाटतो, याबाबत सीबीआयमार्फत सखोल चौकशी व्हावी यासाठी उद्या जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात येणार आहे. संघटनेच्या काही सभासदांची कामकाजात सहभागी न होण्याची भूमिका आहे.