छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेत फूट पडताना पालघरहून सुरतला जाणाऱ्या आमदारांना मुभा देणारे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना शंभर दिवसांच्या सरकारच्या प्रगतिपुस्तकात वरचे स्थान मिळाले आहे. वास्तविक या पोलीस अधीक्षकांविरोधात बदल्यांमध्ये घोटाळे करण्यापासून अवैध धंद्याला संरक्षण देण्यापर्यंतच्या तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारीची प्रतही आपल्याकडे आहे, असा दावा करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या शंभर दिवसांच्या प्रगतिपुस्तकावर टीका केली.
महिनाभरापूर्वी गुणांकनामध्ये तळाशी असणाऱ्या अनेक विभागांच्या कामगिरीत अचानक सरशी झाल्याचे दाखवले आहे. काही जणांना गुण वाढवून दिले आहेत, तर काही जणांना नाहकच नापास करण्यात आले असल्याचा दावा करत दानवे यांनी बाळासाहेब पाटील यांच्या नावाचे उदाहरण शुक्रवारी पत्रकार बैठकीमध्ये आवर्जून सांगितले. राज्यात गुजरातहून येणारा अवैध गुटखा पालघरमार्गेच येतो. अनेक अवैध धंदे सुरू असताना पालघरच्या बाळासाहेब पाटील यांच्या जिल्ह्यातील गृह विभागाचे काम ‘चांगले’ असे प्रमाणपत्र देण्यात आले. पाटील यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून, त्याच्या प्रतीही उपलब्ध असल्याचे दानवे म्हणाले.
नागपूरमध्ये वर्दळीच्या ठिकाणी चौदा हत्या झाल्या आहेत. एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना रद्द करण्यात आली आहे. आता पीक कापणीचा प्रयोग पीकविम्याचा निकष बनविण्यात आला आहे. फक्त मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांत २८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमुक्तीचे आश्वासन सरकार विसरले असल्याचा दावा दानवे यांनी केला.पालघरमधील अधीक्षकांची ही तक्रार संजीव शशिकांत जोशी या वकिलाने केली असल्याचा दानवे यांचा आरोप आहे.